जळगाव मिरर | १८ ऑक्टोबर २०२५
आपल्या कामात सदैव तत्पर राहुन सर्वसामान्यांची कामे करणारे आणि माणसांमध्ये मिसळणारा माणूस म्हणजे आयुष्य प्रसाद आहेत. अशा शब्दात पालकमंत्री पाटील यांनी मावळचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या कामाचे कौतुक करून त्यांचा गौरव केला.
तत्कालीन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा निरोप समारंभ व नवीन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा स्वागत समारंभ प्रसंगी पालकमंत्री श्री पाटील बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर आमदार, सुरेश(राजू मामा )भोळे, आमदार किशोर पाटील, आमदार मंगेश चव्हाण तत्कालीन जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद, जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक महेश्वरी रेड्डी, महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, श्रीमती इंद्रायणी मिश्रा, अपर जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर उपस्थित होते.
पालकमंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी कामात सर्वांना सामावून घेऊन काम केले पाहिजे, त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे आयुष प्रसाद त्यांनी महसूल विभागासोबतच पोलीस जिल्हा परिषद महानगरपालिका, यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून कामात सामावून घेऊन काम केले. ते पुढे म्हणाले, वडाचे झाड कितीही मोठे असले तरी त्याच्या पारंब्या जमिनीतच असतात त्याप्रमाणेच आयुष प्रसाद यांनी आपल्या पदाचा गर्व न करता, जमिनीवर राहूनच सर्वांची कामे केले. सर्वसामान्य जनतेची कामे झाली पाहिजे अशी त्यांची प्रामाणिक इच्छा होती, त्यांनी गोरगरिबांची कामे केली. त्यांच्या कामाची शैली अतिशय उत्तम असून ते एक कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत.
जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून पोलिसांना नवीन चार चाकी वाहन, बीटवरील पोलिसांना मोटरसायकल उपलब्ध करून देण्याचे काम पालकमंत्री म्हणून मी आणि सर्व आमदार जिल्हाधिकारी,जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी केले आहे. जळगाव जिल्ह्यात यापूर्वी काम करून जे जे जिल्हाधिकारी गेले आहेत त्यातील बरेच अधिकारी पुढे राज्याचे मुख्य सचिव झाले असल्याचा उल्लेख करून पालकमंत्री पुढे म्हणाले, माझे मन सांगते आहे की, आयुष प्रसाद हे एक दिवस महाराष्ट्राचे मुख्य सचिव होणार, त्यांची कार्यशैली व त्यांनी घेतलेली मेहनत आणि सर्व राजकीय पक्षांशी चांगले संबंध त्यांनी जपले असून, काम करताना त्यांनी मनात कधीच अहंकार बाळगला नाही, सर्वांची कामे त्यांनी केलीत.
ते म्हणाले,यापूर्वी सुद्धा बऱ्याच जिल्हाधिकाऱ्यांनी उत्कृष्ट कामे केली आहेत. काम करताना मन साफ असले तर तुम्हाला यश नक्की मिळेल असे सांगून त्यांनी मावळते जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना पुढील कार्यात यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्यात.पालकमंत्री, गुलाबराव पाटील यांनी यावेळी उत्कृष्ट शेरोशायरी करून सभागृहातील सर्व उपस्थितांची मने जिंकलीत.
आपल्या निरोप समारंभात मनोगत व्यक्त करताना आयुष प्रसाद म्हणाले, जळगाव जिल्ह्यात काम करताना खूप चांगले अनुभव आले सर्व लोक माझे आहेत,मला सर्वांचा अभिमान आहे हे सर्व श्रेय,यश आपले असून आपल्यामुळेच मी विविध विकास कामे करू शकलो, मला जिल्ह्यातून भरपूर शिकायला मिळाल्याचे सांगून ते म्हणाले अहंकार सोडा मनात कधीही अहंकार बाळगू नका आपण प्रशासकीय काम करतो ते आपले कर्तव्यच आहे. आपण ज्याप्रमाणे मला कामात वेळोवेळी मदत केली त्याप्रमाणेच नवीन जिल्हाधिकारी श्री घुगे यांना अशीच मदत करा, नवीन जिल्हाधिकारी श्री घुगे हे एक चांगले अधिकारी आहेत त्यांनी यापूर्वी ठाणे येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना, उत्कृष्ट काम केले आहे. मला विश्वास आहे की, माझ्या निरोप समारंभा पेक्षा जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा निरोप समारंभ मोठा असेल.
नवीन जिल्हाधिकारी रोहन घुगे यावेळी म्हणाले, निरोप समारंभ प्रसंगी मान्यवरांचे मनोगत ऐकताना मला खूप काही शिकायला मिळाले. असे सांगून ते म्हणाले, माझ्या कार्यकाळात अधिकारी कर्मचारी पत्रकार यांच्या ज्या अपेक्षा असतील त्या पूर्ण करण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेल. प्रत्येक वेळी निरोप समारंभ हा होत नसतो तो आपल्या कामा मुळेच आपल्याला दिला जातो. त्यामुळे उत्कृष्ट काम करणे महत्त्वाचे आहे. असे त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार सुरेश भोळे, किशोर पाटील, मंगेश चव्हाण, विविध विभागांचे विभाग प्रमुख, विविध शासकीय संघटनेचे अध्यक्ष,प्रतिनिधी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला महसूल, जिल्हा परिषद,महानगरपालिका आणि इतर विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक,उपविभागीय अधिकारी विनय गोसावी, यांनी केले तर उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांनी आभार व्यक्त केले.