जळगाव मिरर | १८ ऑक्टोबर २०२५
भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्धीकी यांनी उत्तर महाराष्ट्र दौऱ्याप्रसंगी नुकतीच जळगांव जिल्हा भाजपा कार्यालयात भेट दिली. यावेळी त्यांच्या सोबत महाराष्ट्र राज्य हज कमिटी संचालक सलीम बागवान, सुफी संवाद राष्ट्रीय प्रभारी डॉ. अस्लम खान, महाराष्ट्र प्रभारी आबेद अली चौधरी हे उपस्थित होते.
यावेळी भाजपा पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष ॲड शहेबाज शेख, प्रदेश कार्यकारणी सदस्य जहांगिर खान, शब्बीरअली सय्यद यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी त्यांनी कार्यकर्त्यांशी व पत्रकार बांधवांशी संवाद साधला. आज केंद्र व राज्य सरकारने कोणताही भेदभाव न करता अनेक योजनांच्या माध्यमातून मुस्लिम अल्पसंख्यांक समाजाला मदतीचा हात दिला आहे. मुस्लिम समाजाने आज पर्यंत अनेक वर्षे पारंपरिक पद्धतीने काँग्रेस पक्षाला साथ दिली, परंतु त्यातून या समाजाला काहीही साध्य झालेले नाही. त्यामुळे मुस्लिम समाजाचा फक्त वोट बँक म्हणुन उपयोग करणाऱ्या काँग्रेस सारख्या संधी साधू पक्षाची साथ सोडून, मुस्लिम समाजाने भारतीय जनता पक्षासोबत मुख्य प्रवाहात सामील व्हावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. मुस्लिम समाजाचा खरा विकास हा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातूनच शक्य असून काँग्रेस व त्यासारखे इतर पक्ष धर्मनिरपेक्षतेचा आव आणून मुस्लिम समाजाला अनेक वर्षांपासून भाजपची भीती दाखवून स्वतःचा स्वार्थ साधत आहे. त्यामुळे मुस्लिमांनी आता अश्या पक्षांची साथ पूर्णपणे सोडावी असे हि यावेळी बोलताना ते म्हणाले.
यावेळी धीरज वर्मा, प्रकाश पंडित, आसिफ शेख, अ.राउफ शेख, रज्जाक खान, याकूब खान, अफसर शेख, जमील शेख, ईद्रीस शेख, वसीम शेख, अनीस शेख, अकबर काकर, वसीम पटेल, रहीम शेख,नासिर शेख यांच्या सह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.