जळगाव | प्रतिनिधी
दिवाळी म्हणजे नवीनतेचं, उत्साहाचं आणि उजाळ्याचं पर्व. या शुभमुहूर्तावर जळगाव शहरातील नागरिकांनी जुन्या वाहनांकडे पाठ फिरवत नवी दमदार वाहने खरेदी करण्यावर भर दिला आहे. वाहन विक्रेत्यांच्या मते, यंदा जुन्या वाहनांची विक्री घटली असून नवीन वाहनांच्या खरेदीत मोठी वाढ झाली आहे.
शहरातील नामांकित शोरूम्समध्ये दिवाळीच्या दोन आठवडे आधीपासूनच ग्राहकांची वर्दळ सुरू झाली होती. विशेष म्हणजे, फक्त चारचाकीच नाही, तर दुचाकी वाहनांच्या खरेदीतही लक्षणीय वाढ झाली आहे. ग्राहक नवीन तंत्रज्ञान, कमी इंधन खर्च आणि आकर्षक फायनान्स योजना पाहून जुनी वाहने विकून किंवा स्क्रॅपमध्ये टाकून नवीन वाहनांकडे वळताना दिसत आहेत. तर यंदाच्या दिवाळीत इलेक्ट्रिक दुचाकीला मोठी मागणी होती. या इलेक्ट्रिक दुचाकीत अनेक कंपन्यांचे वाहन बाजारात उपलब्ध झालेले असून त्यांसाठी अनेकांनी इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यावर भर दिला आहे.
पर्यावरणपूरक निवडही कारणीभूत
काही नागरिकांनी पर्यावरणाचा विचार करत प्रदूषणमुक्त इलेक्ट्रिक दुचाकींचा पर्याय निवडला आहे. जुन्या वाहनांमुळे वाढणारे प्रदूषण, मेंटेनन्सचा खर्च आणि सरकारकडून मिळणाऱ्या स्क्रॅप पॉलिसीच्या योजनाही या बदलाला कारणीभूत ठरत आहेत.
जीएसटीचा निर्णय अन जुन्या वाहनांकडे फिरली पाठ
देशातील मोदी सरकारने मागील महिन्यात अनेक महत्वाचे निर्णय घेत जनतेला मोठा दिलासा दिला होता. त्यात दुचाकीसह चारचाकीवरील जीएसटीची देखील कपात करण्यात आल्याने अनेकांनी दुचाकीसह चारचाकी घेण्यासाठी जुन्या बाजाराकडे न जाता थेट नवीन शोरूममध्ये जावून मोठ्या थाटात दुचाकी व चारचाकीची खरेदी केली आहे.
जुने वाहन खरेदी केल्याने येणाऱ्या प्रमुख अडचणी
जळगावातील अनेक ठिकाणी जुन्या वाहनांची मोठ्या प्रमाणात विक्री असली तरी भविष्यात जुन्या वाहनांमध्ये अनेक वेळा पार्ट्स जुने झाल्यामुळे सतत दुरुस्तीची गरज भासते. इंजिन, ब्रेक, गिअर सिस्टम यांसारख्या महत्त्वाच्या भागांची रिपेअरिंग खर्चिक ठरते. खूप जुने मॉडेल असेल, तर त्याचे स्पेअर पार्ट्स सहज मिळत नाहीत. त्यामुळे वेळ आणि पैसे दोन्ही वाया जाण्याची शक्यता असते. जुनी वाहने नवीन वाहनांइतकी इंधन बचत करत नाहीत. त्यामुळे दररोजच्या वापरात पेट्रोल/डिझेलचा खर्च अधिक येतो. जुन्या वाहनांमधून प्रदूषक घटक जास्त प्रमाणात बाहेर पडतात. यामुळे पर्यावरणावर वाईट परिणाम होतो आणि प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC) मिळवणे कठीण होऊ शकते. जुने वाहन खरेदी करताना आरटीओ मध्ये नाव बदली, टोकन, रोड टॅक्स, इंश्युरन्स ट्रान्सफर यांसारखे अनेक कागदोपत्री व्यवहार करावे लागतात, जे वेळखाऊ आणि त्रासदायक ठरू शकतात. जुन्या वाहनांमध्ये नवीन तंत्रज्ञानासारखे सुरक्षितता फीचर्स (एअरबॅग्स, ABS, रिव्हर्स कॅमेरा) नसतात, ज्यामुळे अपघाताच्या वेळी धोका वाढतो. जुनं वाहन खरेदी केल्यावर त्याची पुन्हा विक्री करताना खूपच कमी किंमत मिळते. कधी कधी जुने वाहन विकणारे योग्य कागदपत्र न देता, अपूर्ण माहिती देतात. अशावेळी भविष्यात कायदेशीर गुंतागुंत होण्याची शक्यता असते – उदा. वाहन पूर्वी गुन्ह्यात वापरले गेले असेल तर?
