जळगाव मिरर । ३१ ऑक्टोबर २०२५
जळगाव जिल्ह्यातील आठ ते दहा शाळांतील मुख्याध्यापकांना बोगस शालार्थ प्रणाली, कायम मान्यता आदेश, शालार्थ मंजुरी आदेश आणि शाळेच्या मान्यतेच्या कागदपत्रांबाबत चौकशीची नोटीस बजावण्यासाठी नाशिक रोड पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकाऱ्यांचे पथक जळगावात दाखल झाले आहे.
शिक्षण विभागाकडून फोन करून मुख्याध्यापकांना बोलविण्यात आले; मात्र, एकही मुख्याध्यापक आले नाहीत. त्यामुळे शेवटी नाशिक रोड पोलिसांचा जळगावात एका रात्रीचा मुक्काम वाढला आहे. जळगाव जिल्ह्यातील बोगस शालार्थ प्रणालीच्या माध्यमातून अनेक शाळांमध्ये शिक्षकांची नियुक्ती केली असल्याची शंका आहे.
चौकशी करण्यासाठी अमळनेर, एरंडोल, मुक्ताईनगर या तालुक्यातील आठ ते दहा शाळांच्या मुख्याध्यापकांना नोटीस बजावण्यासाठी नाशिक रोड आर्थिक गुन्हे शाखेचे पथक जळगावात दाखल झाले आहे. दि. ३१ ऑक्टोबर रोजी मुख्याध्यापक किंवा शाळेतील कर्मचारी यांना शिक्षण विभागात नोटीस स्वीकारण्यासाठी बोलविले आहे. अनेक मुख्याध्यापकांनी आजारपण, अपघात अशी कारणे देऊन हजर होण्याचा प्रयत्न टाळला. मात्र, नंतर शाळेतील कर्मचारी कोणालाही पाठवण्यास सांगितल्यावर मुख्याध्यापकांनी शिपायांना पाठवितो, असे सांगितले आहे.
शिक्षकांचे वैयक्तिक मान्यता प्रस्ताव, शाळेची संच मान्यता, मंजुरीचे आदेश, कायम मान्यता आदेश, शालार्थ प्रस्ताव, शालार्थ मंजुरी आदेश, शाळेच्या मान्यतेची कागदपत्रे, अनुदानाची कागदपत्रे, तुकडी मान्यता कागदपत्रे, शाळेत पूर्वीपासूनची नियुक्ती कर्मचाऱ्यांच्या मान्यता, शाळेतील २०१० ते २०२४ पर्यंतची पगार पत्रके, हजेरी पत्रके, दहावीच्या परीक्षेला सुपरवायझर नियुक्ती याद्या (२०१० पासून), तसेच शाळेतील नमूद पगार पत्रक संबंधित माहिती आणि कर्मचारी यांचे सर्व्हिस बुक यांसह अनेक कागदपत्रांची नाशिक रोड पोलिस स्टेशनला तपासणी करण्यात येणार आहे. याशिवाय, शिक्षण विभागातील काही कागदपत्रेही ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले आहे.

 
			

















