जळगाव मिरर | ३१ ऑक्टोबर २०२५
गेल्या काही वर्षापासून छत्रपती शिवाजीनगर उड्डाणपूल ते दूध फेडरेशन या रस्त्यावर अनेक छोट्या मोठे परिसर लागून आहे. त्यामुळे या रस्त्यावर दिवस-रात्र अवजड वाहनांची प्रचंड वर्दळ असल्याने या रस्त्यावर आजवर शेकडो अपघात झाले आहे. अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र आता याच रस्त्यावर टाकण्यात आलेले गतिरोधक कुठलीही परवानगी न घेता काढल्याने परिसरातील नागरिकांचा एकच संताप व्यक्त करीत आहे. जर यावर मनपाने कुठेलीही कारवाई केली नाही तर परिसरातील नागरिक व सामाजिक कार्यकर्ते आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रेल्वे स्थानक ते दूध फेडरेशन परिसरातील नागरिकांचा जीव पुन्हा एकदा धोक्यात आला आहे. अवजड आणि भरधाव वाहनांमुळे वारंवार अपघात होणाऱ्या या ‘ब्लॅक स्पॉट’वर अपघातांना आळा घालण्यासाठी जे गतिरोधक टाकण्यात आले होते, ते काही अज्ञात लोकांनी जेसीबी लावून अचानक काढून टाकले आहेत. या संतापजनक घटनेमुळे, पुन्हा अपघात होऊन लोकांचे जीव जाण्याची भीती निर्माण झाली आहे. गेल्या दहा महिन्यांपूर्वी दूध फेडरेशनजवळ विटांच्या ट्रॅक्टरला डंपरने धडक दिली, ज्यात ट्रॅक्टरचालकाचा जागीच मृत्यू झाला होता. सुदैवाने, त्याचवेळी स्कूल व्हॅनमधून उतरणारी चिमुकली बचावली होती. या जीवघेण्या घटनेनंतर तात्पुरती उपाययोजना म्हणून रस्त्याच्या दोन्ही बाजूला गतिरोधक टाकण्यात आले होते.
पण आता, नागरिकांचा जीव वाचविणारे हे ‘सेफ्टी ब्रेक’ कोणाच्या आदेशाने आणि कोणत्या हितसंबंधातून काढण्यात आले, असा प्रश्न सर्व सामान्य नागरिक विचारू लागले आहे. ज्यांनी नागरिकांच्या सुरक्षिततेशी खेळ केला, त्या व्यक्तींवर तत्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे. तसेच, यासाठी वापरण्यात आलेला जेसीबी कोणाचा आहे, याचा शोध घेऊन त्यालाही आरोपी करावे आणि जेसीबी जप्त करावा अशी मागणी होत आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत महापालिका आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले असून, गतिरोधक काढणाऱ्यांवर कारवाईचे आश्वासन दिले आहे.

 
			

















