जळगाव मिरर । 31 ऑक्टोबर 2025
गेल्या काही महिन्यापासून जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणाहून अवैध वाळू चोरी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यावर महसूल प्रशासनाकडून कुठलीही कारवाई होत नसल्याची चर्चा जळगाव जिल्ह्यात दिसून येत आहे. मात्र आता जिल्हा पोलिस दलाचे प्रमुख पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्वतः बुधवारी दुपारी आकाशवाणी चौकातून बेकायदा वाहतूक करणारा ट्रक पकडून महसूल विभागाच्या ताब्यात दिला. त्याला दोन दिवस उलटून गेल्यावर देखील महसूल विभागाकडून गुन्हा दाखल झालेला नसून या प्रकरणात अवैध वाळू वाहतुकीला महसूल विभागाचे पाठबळ आहे का ? असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. रेड्डी बुधवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास घरी जेवणासाठी जात असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या आकाशवाणी चौकात धडकणारा ट्रक (एमएच १९ झेड २४४४) ट्रक त्यांनी थांबवला. त्यानंतर जिल्हापेठ पोलिसांना कळवून ट्रक ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या. जिल्हापेठ पोलिसांनी ट्रक ताब्यात घेवून पोलिस ठाण्याच्या आवारात आणला. पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी तहसीलदारांना याबाबत कळवले. त्यानुसार म्हसावदचे मंडळाधिकारी अभिजित येवले यांनी पथकासह पोहचून ट्रक ताब्यात घेतला.
महसूल प्रशासन झोपेत ?
जळगाव जिल्ह्यातील गिरणा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खनन दिवस -रात्र सुरू असून याकडे महसूल प्रशासन ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष करीत आहे का ? असा देखील सवाल जळगाव जिल्ह्यातील नागरिक आता विचारू लागले आहे. महसूल प्रशासनातील काही बडे अधिकारीच जर शासकीय नियमाला फाट्यावर मारत असतील तर सर्व सामान्य नागरिकांनी शासकीय नियम का पाळावे असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.

 
			

















