
अमळनेर : प्रतिनिधी
शहरातील गुलमोहर कॉलनीच्या अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सर्व शिक्षा अभियानातील कनिष्ठ अभियंता प्रशांत एकनाथ देसले यांनी गलवाडे रस्त्यावर असलेल्या शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. नैराश्यामुळे मी आत्महत्या करत असल्याचे त्यांनी चिठ्ठीत लिहल्याचे आढळले आहे.
येथील पंचायत समितीमधील सर्व शिक्षा अभियानाचे कनिष्ठ अभियंता प्रशांत देसले हे रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने त्यांच्या पत्नीने शिक्षण विभागातील विजय बारी, अरुण शिंदे, शिक्षक किरण पाटील यांना देसले हे घरी न आल्याची माहिती दिली. रात्री सव्वादोन वाजेपर्यंत त्यांनी संपूर्ण शहरात देसले यांचा शोध घेतला. दरम्यान, पहाटे गलवाडे रस्त्यावर झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत देसले यांचा मृतदेह सैन्य दलात भरतीसाठी सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिसला. दरम्यान, देसले यांनी दुचाकी (एमएच १९, सीएस- १२६८) वर चढून नॉयलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. ही माहिती समजताच मारवड पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व देसले यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी हिरालाल शांताराम पाटील यांच्या माहितीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.




















