जळगाव मिरर । ४ नोव्हेबर २०२५
पारोळा जाण्याकरीता बस स्टॅण्डजवळील टपरीच्या मागे उभ्या असलेल्या प्रवीण उर्फ सोनू सुभाष बडगुजर (वय ४२, रा. कढोली, ता. एरंडोल) यांच्यावर गोळीबार झाला. यामध्ये त्यांच्या खांद्याला गंभीर दुखापत होवून गंभीर जखमी झाला. ही घटना सोमवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास कढोली गावातील बस स्टॅण्ड चौकात घडली. हा गोळीबार गावातील वाळू व्यावसायीकाच्या मुलाने केल्याची माहिती पोलिसांच्या तपासात उघउ झाली असून त्याचा कसून शोध सुरु आहे.
सविस्तर वृत्त असे कि, एरंडोल तालुक्यातील खेडी कढोली गावात प्रवीण उर्फ सोनू बडगुजर हे वास्तव्यास असून त्यांचे गावातील बस स्टॅण्ड चौकात अंडाभूर्जीचे दुकान आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास सोनी बडगुजर हे पारोळा जाण्याकरीता बस स्टँडवर बसची वाट पाहत एका टपरीच्या मागे उभे होते. यावेळी कोणतरी अज्ञात व्यक्तीने भर चौकात गोळीबार केला, यामध्ये बडगुजर यांच्या खांद्याला गोळी लागून ते गंभीर जखमी झाले. गोळीबार झाल्यामुळे गावात एकच खळबळ माजून गेली होती. हा प्रकार त्यांच्या लक्षात येताच त्यांना तात्काळ उपचारार्थ शहरातील रिंगरोड परिसरात असलेल्या खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास हद्दपार आणि एमपीडीएची कारवाई झालेल्या संशयिताकडून परप्रांतीय मजूरांवर गोळीबार करण्यात आला. त्या घटनेला २४ तास पुर्ण होत नाही तोच पुन्हा वाळू व्यावसायीकाकडून गोळीबार झाल्यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
गोळीबार करणारा हा वाळू व्यावसायीक असून तो जखमी सोनू बडगुजर यांचा मित्र आहे. गावठी पिस्तुल हाताळतांना हा फायर झाल्याची चर्चा गावात सुरु होती. या घटनेनंतर पोलीस यंत्रणा खळबळून जागी झाली. त्यांनी जखमी तरुणाचा जाबाब नोंदवून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.



















