जळगाव मिरर | ४ नोव्हेंबर २०२५
पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेला पोलिस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी याला तब्बल दोन कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले आहे. तक्रारदाराकडून 46 लाख 50 हजार रुपये स्वीकारताना सापळा रचून एसीबीच्या पथकाने ही कारवाई केली. न्यायालयाने आरोपीला 6 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे वकील असून त्यांच्या आशिलाविरुद्ध बावधन पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास पीएसआय चिंतामणी यांच्याकडे होता. गुन्ह्यात अटकेत असलेल्या आशिलाच्या वडिलांना जामीन प्रक्रियेत मदत करण्याच्या मोबदल्यात आरोपीने तब्बल दोन कोटी रुपयांची लाच मागितल्याचे उघड झाले. त्यापैकी एक कोटी स्वतःसाठी आणि एक कोटी वरिष्ठांसाठी मागितल्याचा आरोप आहे.
तक्रारदाराने पहिला हप्ता म्हणून 50 लाख रुपये देण्याचे मान्य केले होते. एसीबीने सापळा रचून 46 लाख 50 हजार रुपये (यात 1.5 लाख खरे व 45 लाख खेळण्यातील नोटा) स्वीकारताना चिंतामणी याला पकडले. त्याच्याकडून दोन मोबाईल फोन आणि एकूण 46.53 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग आहे का, याचा तपास कोठडीदरम्यान करण्यात येणार असून एसीबीच्या या कारवाईमुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.



















