जळगाव मिरर | ५ नोव्हेंबर २०२५
ऑनलाइन गुंतवणुकीतून अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून आणि फेसबुकवरून ओळख वाढवून एका सायबर गुन्हेगाराने अमळनेर येथील डॉक्टरची तब्बल २७ लाख ९५ हजार ६३० रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी डॉक्टरांनी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर येथील ४८ वर्षीय डॉक्टर हे फेसबुकवर सक्रिय असताना ‘अंकिता देसाई’ नावाच्या महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट त्यांनी ऑक्टोबर २०२५ मध्ये स्वीकारली. तिने स्वतःला ट्रस्ट बुकिंग कस्टमर सर्व्हिस या ऑनलाइन गुंतवणूक कंपनीशी संबंधित असल्याचे सांगत डॉक्टरांना अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले.
यानंतर व्हॉट्सअॅप आणि टेलिग्रामद्वारे संपर्क साधून तिने डॉक्टरांना एका लिंकवर माहिती भरायला सांगितली. सुरुवातीला १० हजार रुपये गुंतवून वेबसाईट्स व हॉटेल्सना ५ स्टार रिव्ह्यू देण्याचे टास्क दिले. प्रत्येक टास्कवर ०.२५ टक्के नफा मिळेल, असे सांगण्यात आले. सुरुवातीला ९०० रुपयांचा नफा दिसल्याने डॉक्टरांचा विश्वास बसला. यानंतर वेळोवेळी विविध बँक खात्यांवर रक्कम पाठवत डॉक्टरांनी एकूण २७ लाख २५ हजार ६३० रुपये भरले. अॅपमध्ये त्यांना ३६ लाख ८२ हजार २७५ रुपयांचा नफा झाल्याचे दाखवण्यात आले. मात्र, पैसे परत घेण्याचा प्रयत्न केल्यावर अॅप बंद झाले.
डॉक्टरांनी आरोपी महिलेशी संपर्क साधल्यावर तिने उडवाउडवीची उत्तरे दिली आणि आणखी पैसे भरण्याची मागणी केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डॉक्टरांनी २९ ऑक्टोबर रोजी सायबर पोर्टलवर तक्रार नोंदवली, त्यानंतर प्रकरण सायबर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.



















