जळगाव मिरर | ५ नोव्हेंबर २०२५
शहरापासून नजीक असलेल्या एमआयडीसी परिसरातील अवैध दारूच्या अड्ड्यावर रविवारी रात्री झालेल्या गोळीबार प्रकरणातील संशयित हल्लेखोर दाम्पत्य राहुल रामचंद्र बऱ्हाटे (वय ३५) आणि मोनाली राहुल बऱ्हाटे (वय ३०, दोघे रा. रामेश्वर कॉलनी) यांना पोलिसांनी नांदूर गावाजवळून पकडले. या घटनेत एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
सविस्तर वृत्त असे की, उत्तरप्रदेशातील फिरोज शेख, राजन शेख आणि काही मजूर एमआयडीसीतील विजेते कंपनीत काम करतात. कंपनीपासून काही अंतरावर राहुल बऱ्हाटे याची पानपटरी असून, तो तेथे अवैधरित्या दारू विक्री करीत होता. रविवारी रात्री १० वाजता सरफू अहमद हा पुडी घेण्यासाठी गेला असता, राहुलने त्याला मारहाण केली. त्यानंतर कंपनीतील कामगार समजविण्यासाठी गेले असता, राहुलची पत्नी मोनाली स्कुटरवर घटनास्थळी आली आणि तिने राहुलच्या हातात गावठी पिस्तुल दिले.
राहुलने या पिस्तुलातून गोळीबार करून राजन शेख रफिउल्ला व अहमद फिरोज शेख या दोघांना जखमी केले. गोळी राजनच्या किडनीजवळ लागल्याने त्याची प्रकृती चिंताजनक होती. उपचारादरम्यान सोमवारी दुपारी त्याचा मृत्यू झाला असून, या गुन्ह्यात खुनाचे कलम वाढविण्यात आले आहे. गोळीबारानंतर दोघ दाम्पत्य घटनास्थळावरून पळून गेले होते. एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने त्यांचा शोध सुरू ठेवला. दरम्यान, पथकाला माहिती मिळाली की संशयित दाम्पत्य दुचाकीवरून नांदूराच्या दिशेने जात आहे. पोलिसांनी सापळा रचून नांदूरा चौफुलीजवळ दोघांना जेरबंद केले. हल्लेखोर राहुल बऱ्हाटे याच्याविरुद्ध यापूर्वीही ८ ते १० गंभीर गुन्ह्यांची नोंद असून, त्याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई झाली होती. मंगळवारी न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना १० नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, सफौ. विजयसिंग पाटील, प्रदीप चौधरी, किरण चौधरी, गणेश ठाकरे, नितीन ठाकूर, शशिकांत मराठे, किरण पाटील आणि गिरीष पाटील यांच्या पथकाने केली.



















