मुबई : वृत्तसंस्था
‘मला भेटण्यासाठी देवेंद्र फडणवीस घरी आले होते. तेव्हा मी त्यांना म्हटलं उगाच फुकटचं श्रेय घेऊ नका. ते जोरजोरात हसायला लागले. जी गोष्ट घडली, ती ना फडणवीसांनी घडवली, ना अमित शहांनी घडवली, ना भाजपाने, ना अजून कोणी. शिवसेना फुटण्याचे श्रेय केवळ उद्धव ठाकरेंनाच जाते. हे एकदा घडलेलं नाही. आज आमदार बाहेर पडले, तेव्हा मी बाहेर पडलो होतो. तेव्हाची व आताची कारणे एकच आहेत,’ असेही राज ठाकरे एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
शिवसेनेतील फुटीचे श्रेय भाजपला नव्हे तर स्वतः सेना नेतृत्वाला जात असल्याची तिखट टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याच्यावर निशाणा साधताना केली. ‘शिवसेनेची वाटचाल ऱ्हासाकडे सुरू झाली आहे. त्यामुळे हळहळ करण्यात अर्थ नाही,’ असे ते म्हणाले. ‘उद्धव बोलतात एक व करतात दुसरेच,’ असेही राज यावेळी उद्धव यांच्यावर अविश्वास दर्शवत म्हणाले.
‘सद्यस्थितीत ‘मातोश्री’ संकटात असल्याचा दावा केला जात आहे. त्यात कोणतेही तथ्य नाही. मातोश्री एक वास्तू आहे. त्यावर कोणतेही संकट नाही. वास्तू व संघटना वेगळी असते. सध्या संघटना म्हणजे शिवसेना लयास जाण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे,’ असे राज म्हणाले.
‘उद्धव ठाकरेंना पूर्ण देश जेवढा ओळखत नाही, तेवढा मी ओळखतो. ते विश्वास ठेवण्यासारखे नाहीत. यापूर्वी मनसे व शिवसेनेतील टाळीसंबंधीची कथित चर्चा झाली. पण उद्धव ठाकरे बोलतात एक व करतात दुसरेच,’ असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.




















