जळगाव मिरर | २५ नोव्हेंबर २०२५
महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा २३ नोव्हेंबर २०२५ रोजी जैन हिल्स येथे अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेचे सल्लागार अशोक जैन, अधिकृत निरीक्षक ए. के. रायजादा यांच्या उपस्थितीत झाली. त्यांच्या उपस्थितीत नोव्हेंबर २०२५ ते नोव्हेंबर २०२८ या कालावधीसाठी नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेच्या अध्यक्षपदी गोंदियाच्या डॉ. परिणय फुके यांची, तर मानद सचिवपदी पुण्यातील निरंजन गोडबोले यांची निवड करण्यात आली. यामध्ये जळगावातून सिद्धार्थ मयूर व जैन स्पोर्टस अॅकडमीचे रविंद्र धर्माधिकारी यांची सुद्धा निवड झाली आहे. ग्रॅण्ड मास्टर विदीत गुजराथी, ग्रॅण्डमास्टर अभिजीत कुंटे, महिला ग्रॅण्डमास्टर सौम्या स्वामीनाथन, ग्रॅण्डमास्टर स्वाती घाटे हे संघटनेमध्ये खेळाडू प्रतिनिधी म्हणून काम करतील. निवडणूक अधिकारी म्हणून अॅड. चंद्रशेखर जामदार यांनी काम पाहिले. निर्वाचित सदस्यांसह राज्यभरातील प्रतिष्ठित जिल्हा प्रतिनिधी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेची नवीन कार्यकारणी
अध्यक्ष म्हणून डॉ परिणय फुके (गोंदिया), तर कार्याध्यक्ष : सिद्धार्थ मयूर (जळगाव), सरचिटणीस: निरंजन गोडबोले (पुणे), खजिनदार : भरत चौगुले (कोल्हापूर), उपाध्यक्ष : सुनील रायसोनी (नागपूर), चिदंबर कोटीभास्कर (सांगली), श्रीराम खरे (रत्नागिरी), सहसचिव : सतीश ठाकूर (जालना), डॉ. दीपक तांडेल (ठाणे), अश्विन मुसळे (चंद्रपूर) तर नियुक्त सदस्य म्हणून राजेंद्र कोंडे (उपाध्यक्ष), अंकुश रक्ताडे (सहसचिव) जळगावेच रवींद्र धर्माधिकारी (सहसचिव) यांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या सदस्यांची जळगाव जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनचे अध्यक्ष तथा जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांच्यासह जळगाव जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्यात.
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात बुद्धिबळाच्या वाढीसाठी दूरदृष्टी, सचोटी आणि वचनबद्धतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नवनिर्वाचित समितीचे अभिनंदन करत यावेळी जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे अध्यक्ष अशोक जैन म्हणाले की, राज्यात बुद्धिबळाच्या एका नवीन आणि एकत्रित प्रवासाची सुरुवात झाली. नवीन उपक्रम राबवण्यास, खेळाडूंना सक्षम करण्यास आणि महाराष्ट्रात मजबुत बुद्धिबळ खेळाडू घडविण्यासाठी दूरदर्शी संघ निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याचा सल्लासुद्धा त्यांनी यावेळी नवीन कार्यकारणीला दिला.





















