जिल्हा शल्यचिकित्सकांचे दुर्लक्ष : पालकांमध्ये भीतीचे वातावरण
जळगाव मिरर | संदीप महाले
जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशू कक्षात गंभीर अनियमितता आणि गोंधळ निर्माण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या कक्षात नेहमीच काही ना काही घटना घडत असतात. मात्र यावेळी स्थिती अधिक चिंताजनक असून, थेट लहान बालकांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवजात शिशूंसाठी असलेल्या काचेच्या पेट्यांमध्ये एकाच वेळी दोन बालक ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. अशा प्रकारे एका पेटीत दोन बालक ठेवणे आरोग्यदायी नसून त्यातून गंभीर संसर्गजन्य धोके निर्माण होऊ शकतो. संबंधित कर्मचाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याची चर्चा आहे. या विभागात सर्वसामान्यांना प्रवेशबंदी असल्याने बाहेरून कोणालाही वास्तविक परिस्थितीचा अंदाज लागत नाही आणि त्यामुळे कारभार अधिकच मनमानीने चालवल्याचा आरोप केला जात आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांच्या अधिपत्याखाली या विभागाचे कामकाज चालत आहे. मात्र, कक्षातील वाढत्या गोंधळावर आणि तक्रारींवर त्यांनी पुरेसे लक्ष दिले नसल्याने पालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. नवजात बालकांचे आरोग्य अत्यंत नाजूक असते. स्वच्छतेपासून ते देखरेखीपर्यंत प्रत्येक गोष्ट काटेकोरपणे पार पाडली जाणे आवश्यक आहे. अशा स्थितीत बेफिकीरपणा किंवा दुर्लक्ष केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.
काही पालकांनी सांगितले की, कक्षातील उपकरणांची योग्य देखभाल केली जात नसल्याने ते वारंवार बंद पडतात. तसेच, कर्मचाऱ्यांची कमतरता, कामाचा ताण आणि योग्य देखरेखीचा अभाव यामुळे गोंधळाचे प्रमाण वाढले आहे. अशा परिस्थितीत नवजात बालकांची काळजी घेणे आव्हानात्मक ठरत आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची मागणी आता जोर धरत आहे. स्थानिक सामाजिक संस्था आणि पालकांनी प्रशासनाने तातडीने चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी, तसेच नवजात शिशू कक्षातील सुविधा आणि देखरेख प्रणाली सुधारावी, अशी मागणी केली आहे.
शल्सचिकित्सकांचे झाले दुर्लक्ष
नवजात शिशूंची काळजी घेणे हे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे काम असतांनाही त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. जिल्हा शल्सचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी सातत्याने कर्मचाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम केले असल्याचा आरोप होत आहे. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
याबाबत जळगाव जिल्हा जिल्हा शल्सचिकित्सक डॉ. किरण पाटील यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले कि, एखादी वेळेस बालकांची संख्या जास्त झाली तर त्यांना आम्ही तपासणी करून एकाच पेटीत ठेवले असेल. याबाबत अधिक माहिती घेतो.




















