नंदुरबार जिल्हा बॉक्सिंग कार्यकर्त्यांची बैठक उत्साहात
जळगाव मिरर | २६ नोव्हेंबर २०२५
महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटनेच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या नंदुरबार जिल्हा बॉक्सिंग संघटनेच्या कार्यकारणी व तळागाळातील क्रीडाप्रेमी कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक आज यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, नंदुरबार येथे उत्साहात पार पडली. या बैठकीस प्रमुख मार्गदर्शनासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे, राज्य संघटनेचे नाशिक विभागीय सचिव मयूर बोरसे तसेच जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष पुष्पेंद्र रघुवंशी, जिल्हा सचिव प्रा. राकेश माळी, यशवंत विद्यालयाचे पर्यवेक्षक विलास पाटील, कार्याध्यक्ष डॉ. जितेंद्र माळी, कोषाध्यक्ष डॉ. मयूर ठाकरे हे उपस्थित होते. कार्यक्रमाला विशाल भट, आकाश बोडरे, मनीष सनेर, योगेश माळी, अनिल रौंदळ, योगेश सोनवणे, नकुल चौधरी, क्रीडाशिक्षक मीनलकुमार वळवी, भरत चौधरी, रुपेश महाजन, तसेच तेजस्विनी चौधरी यांच्यासह पंच, प्रशिक्षक, क्रीडाप्रेमी व खेळाडूंची उपस्थिती लाभली.
बैठकीत जिल्ह्यातील बॉक्सिंगची कामगिरी, क्रीडा सुविधा, नवीन प्रशिक्षण शिबिरे, खेळाडूंच्या संधी, तसेच आगामी स्पर्धांबाबत चर्चा झाली. नंदुरबार जिल्हा हा राज्यातील आदिवासी व दुर्गम भाग म्हणून ओळखला जात असला तरी राज्य संघटनेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा संघटनांना बळकटी देऊन भरीव निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचा विश्वास विभागीय सचिव मयूर बोरसे यांनी व्यक्त केला. ग्रामीण पातळीवर बॉक्सिंगची भक्कम चळवळ उभी करण्यासाठी संयुक्तपणे काम करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. “खेळाडूंना योग्य व्यासपीठ देण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने लक्ष घालून परिश्रम घ्यावेत,” असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांनी विभागीय सचिव मयूर बोरसे यांचा सत्कार करून मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, शासन व संघटनेच्या माध्यमातून बॉक्सिंगसह इतर ऑलिंपिक खेळांच्या शिबिरांचे आयोजन करून जिल्ह्यातून राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडवण्याचे प्रयत्न व्हावेत. यासाठी शिक्षण विभागाच्या माध्यमातून आवश्यक सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश वंजारी यांनी तर आभार प्रदर्शन योगेश माळी यांनी केले.




















