जळगाव मिरर | ६ डिसेंबर २०२५
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे 9 ते 14 डिसेंबर 2025 दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय वरिष्ठ बॉक्सिंग स्पर्धेसाठी धुळे जिल्ह्यातील अनुभवी पंच ऋषिकेश अहिरे यांची राज्यस्तरीय पंच म्हणून निवड झाली आहे.
ऋषिकेश अहिरे यांनी यापूर्वी राज्य शालेय बॉक्सिंग स्पर्धा, संघटना आयोजित विविध राज्य, जिल्हा व विभागीय स्पर्धा, तसेच पोलीस क्रीडा स्पर्धांमध्ये उत्कृष्ट पंच म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. त्यांच्या अचूक निरीक्षणशक्ती, नियमांचे सखोल ज्ञान आणि शांत निर्णयक्षमतेमुळे ते राज्यभरातील पंचांमध्ये विश्वासार्ह नाव झाले आहेत.
विशेष म्हणजे, गेल्या 12 वर्षांपासून ते धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे तांत्रिक अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. या काळात त्यांनी विविध स्पर्धांचे तांत्रिक व्यवस्थापन, पंचांचे मार्गदर्शन, नियमांची अंमलबजावणी आणि स्पर्धा आयोजित करण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष तथा धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, उपाध्यक्ष कैलास जैन, खजिनदार राजेंद्र बोरसे, लिंबाजी प्रताळे, किशोर पाटील, योगेश पाटील, प्रशिक्षक विजेंद्र जाधव, धीरज पाटील, प्रा. भरत कोळी, भूषण पवार तसेच धुळे जिल्हा व नाशिक विभागीय सचिव मयूर बोरसे यांनी हार्दिक अभिनंदन व्यक्त करून यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
राज्यस्तरीय स्पर्धेत ऋषिकेश अहिरे उत्तम पंचिंग कामगिरी करून धुळे जिल्ह्याचा गौरव वाढवतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.




















