महादेव हॉस्पीटल येथे रात्री गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी
जळगाव मिरर | १२ डिसेंबर २०२५
येथील आकाशवाणी चौकातील महादेव हॉस्पीटल येथे मध्यरात्री एका गरोदर मातेला अगदी शेवटच्या क्षणी डॉक्टरांनी शस्त्रक्रियेद्वारे यशस्वी उपचार करून मातेसह बाळाचा जीव वाचविण्यात यश मिळवले. या वैद्यकीय पथकाचे गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांनी अभिनंदन केले आहे.
जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील एक २५ वर्षीय गरोदर मातेची प्रकृती गुरुवारी ११ रोजी अचानक बिघडली. यामुळे नातेवाईकांनी या महिलेला तात्काळ रात्री ११ वाजेला महादेव हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले. हॉस्पिटलमध्ये स्त्री रोग व चिकित्साशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. माया आर्वीकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सुधीर नारखेडे, डॉ. मृदुला मुंगसे, डॉ. तेजस खैरनार यांनी तपासणी केली. अतिरक्तस्राव झाल्यामुळे यावेळी महिलेची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. डॉ. नारखेडे यांनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार बाळंतपणातील सर्वात कठीण असणारी गुंतागुंतीची गर्भपिशवीची अवघड शस्त्रक्रिया करून मातेसह बाळाचा जीव वाचवण्यात स्त्री रोग व चिकित्सा शास्त्र विभागाच्या पथकाला यश आले महिलेने ३ किलो ९०० ग्रॅम वजनाच्या मुलाला जन्म दिला. सदर शस्त्रक्रियाकामी डॉ. सुधीर नारखेडे, डॉ.मृदुला मुंगसे, डॉ. तेजस खैरनार यांच्यासह भुलतज्ज्ञ डॉ. भारत सोनवणे, डॉ. काशिनाथ महाजन, डॉ. आकांक्षा राजपूत, डॉ. सोनाली आगलावे, अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र पाटील यांच्यासह परिचारिका, कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. वैद्यकीय पथकाचे गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, महादेव हॉस्पीटलचे डायरेक्टर डॉ. प्रशांत वारके यांनी अभिनंदन केले आहे.




















