जळगाव मिरर | १८ डिसेंबर २०२५
जळगाव जिल्ह्यातील पुन्हा एकदा लाचखोरीची घटना उघडकीस आली आहे. दारूबंदी कायद्यान्वये कारवाई टाळण्यासाठी आणि दारूचा अवैध धंदा विनाअडथळा सुरू ठेवण्यासाठी १८ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून त्यातील १० हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षकासह त्याच्या खासगी चालकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ अटक केली. या कारवाईमुळे जिल्ह्यातील महसूल व उत्पादन शुल्क विभागात एकच खळबळ उडाली आहे.
तक्रारदाराच्या वडिलांवर यापूर्वी दारूबंदी कायद्यान्वये कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा दारूबंदी कायद्याच्या कलम ९३ अन्वये कारवाई न करण्यासाठी तसेच तक्रारदाराचा दारूचा धंदा यापुढेही सुरळीत चालू ठेवण्यासाठी दुय्यम निरीक्षक विजय भास्कर पाटील याने लाचेची मागणी केली होती.
पाटील याने प्रति महिना १,५०० रुपये याप्रमाणे १२ महिन्यांचे एकूण १८,००० रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीनंतर यातील १०,००० रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारण्याचे ठरले. याबाबत तक्रारदाराने १७ डिसेंबर २०२५ रोजी जळगाव एसीबी कार्यालयात लेखी तक्रार दाखल केली. पडताळणीत लाचेची मागणी स्पष्टपणे सिद्ध झाली.
त्यानुसार १८ डिसेंबर रोजी रावेर परिसरात सापळा रचण्यात आला. विजय पाटील याच्या सूचनेनुसार त्याचा खासगी चालक भास्कर रमेश चंदनकर याने तक्रारदाराकडून १०,००० रुपयांची लाच स्वीकारली. लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने दुय्यम निरीक्षक विजय भास्कर पाटील (वय ५१, रा. उहा, ता. मोताळा, जि. बुलढाणा) आणि खाजगी चालक भास्कर रमेश चंदनकर (वय ४३, रा. खानापूर, ता. रावेर) यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत कलम ७ व ७(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक हेमंत नागरे व त्यांच्या पथकाने केली.




















