जळगाव मिरर | १९ डिसेंबर २०२५
कंपनीतून घरी परतणाऱ्या उद्योजक संजय रामगोपाल तापडीया यांच्या वाहनाचा पाठलाग करीत त्यांना थांबवले. त्यांच्यासोबत वाद घालीत रिक्षातून आलेल्या टोळक्याने मारहाण केली. या मारहाणीत त्यांच्या डोक्यावर टणक वस्तूने वार करीत गंभीर जखमी केले. ही घटना दि. १७ डिसेंबर रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्याजवळ घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील एमआयडीसी परिसरात राहणारे संजय तापडीया हे नेहमीप्रमाणे रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास (एमएच १९, ईपी १८१०) कारने कंपनीतून घरी जात होते. एक रिक्षा त्यांच्या कारचा पाठलाग करीत असतांना काही अंतरावर त्यांची कार थांबवली. यावेळी रिक्षात बसलेल्या चार ते पाच जणांनी तापडीया यांना कारमधून बाहेर काढत त्यांना तुम्ही आम्हाला कट मारला असे म्हणत मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी मारहाण करणाऱ्यांपैकी एकाने टणक वस्तूने त्यांच्या डोक्यावर वार केला आणि जीवेठार मारण्याची धमकी देखील दिली. तापडीया यांच्या मुलाने जखमी वडीलांना डॉ.कि शोर बडगुजर यांच्याकडे उपचारासाठी घेऊन गेले. उपचार घेतल्यानंतर तापडीया यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उद्योजकावर हल्ला झाल्यामुळे जिंदाचे अध्यक्ष रवि लढ्ढा, भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीचे प्रमुख अरुण बोरोले, लघु उद्योग भारतीचे विभागीय प्रमुख समीर साने, लक्ष्मीकांत मणियार, उद्योजक महेंद्र रायसोनी, अंजनी मुंदडा, रवि फालक, दिनेश राठी, किशोर ढाके, राजीव बियाणी, जिंदाचे माजी अध्यक्ष ओमप्रकाश सिंग, ओमप्रकाश अग्रवाल, गितेश मुंदडा यांच्यासह मोठ्या संख्येने उद्योजक उपस्थित होते. उद्योजकावर झालेल्या या हल्ल्यामुळे अनेक सुरक्षिततेचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. याप्रसंगी राज्याचे मंत्री गिरीश महाजन, आमदार राजूमामा भोळे, माजी महापौर नितीन लढ्ढा, भाजपचे अरविंद देशमुख यांनी संजय तापडिया यांच्या तब्येतीची चौकशी करुन या भ्याड हल्ल्याचा निषेध केलेला आहे.




















