जळगाव मिरर | २० डिसेंबर २०२५
पोटाची खळगी भरण्यासाठी दिवसभर काबाडकष्ट करून घराकडे परतणाऱ्या एका मजुरावर काळाने झडप घातली आहे. जळगाव तालुक्यातील चिंचोली गावाजवळ शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास सिमेंट वाहून नेणारा ट्रॅक्टर आणि एका मालवाहू पिकअपमध्ये झालेल्या भीषण अपघातात ट्रॅक्टरवरील कामगाराचा जागीच मृत्यू झाला. संजय नामदेव सोनवणे (वय ४०, रा. गेंदालाल मिल, जळगाव) असे या दुर्दैवी मजुराचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संजय सोनवणे हे जळगाव येथील मालधक्क्यावर सिमेंटच्या गोण्या भरण्याचे व उतरवण्याचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. शुक्रवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे इतर सहकाऱ्यांसह सिमेंट भरलेला ट्रॅक्टर (क्र. MH 19 BG 6078) घेऊन चिंचोली गावाकडे गेले होते. तिथे सिमेंट खाली करून जळगाव शहराच्या दिशेने परतत असताना, समोरून येणाऱ्या एका भरधाव मालवाहू पिकअप वाहनाने त्यांच्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली.
या भीषण धडकेत संजय सोनवणे ट्रॅक्टरवरून खाली कोसळले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांच्यासोबत असलेल्या मजुरांनी त्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केले. संजय यांच्या अकाली निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गेंदालाल मिल परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दोन्ही वाहने ताब्यात घेतली असून, अपघाताला कारणीभूत ठरलेल्या चालकावर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.




















