जळगाव मिरर | २२ डिसेंबर २०२५
शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची औपचारिक घोषणा येत्या काही तासांत होणार असल्याचे स्पष्ट संकेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिले आहेत. मुंबईसह नाशिक, कल्याण-डोंबिवली, ठाणे आणि मीरा-भाईंदर या महत्त्वाच्या महानगरपालिकांमधील जागावाटपाच्या चर्चा जवळपास अंतिम टप्प्यात आल्या असून, आज दिवसभरात अंतिम यादीवर शेवटचा हात फिरवला जाणार आहे.
२३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार असल्याने, त्याआधीच शिवसेना आणि मनसेची युती अधिकृतपणे जाहीर केली जाईल. ही घोषणा धुमधडाक्यात, वाजत-गाजत आणि एकत्रितपणे केली जाईल, असे संजय राऊत यांनी सांगितले.
दरम्यान, युतीच्या चर्चेसाठी संजय राऊत हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झाले आहेत. गेल्या चार ते पाच दिवसांतील ही त्यांची तिसरी भेट असून, दोन्ही पक्षांतील नेत्यांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या आहेत.
संजय राऊत यांनी स्पष्ट केले की, केवळ मुंबईच नव्हे तर राज्यातील सर्व मोठ्या शहरांमध्ये शिवसेना आणि मनसे एकत्रितपणे निवडणुका लढवणार आहेत. या युतीला महाराष्ट्रातील जनता उत्स्फूर्त प्रतिसाद देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, नुकत्याच जाहीर झालेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणूक निकालांवर भाष्य करताना राऊत यांनी महायुतीवर जोरदार टीका केली. या निकालांना त्यांनी ‘नाटक’ असे संबोधत, सत्तेचा गैरवापर आणि पैशांची उधळपट्टी करून विजय मिळवण्यात आल्याचा आरोप केला. “रिकाम्या थिएटरमध्ये स्वतःच तिकीट विकत घेऊन ‘हाऊसफुल्ल’ दाखवण्यासारखा हा प्रकार आहे. हा जनतेचा कौल नसून विकत घेतलेला निकाल आहे,” असे ते म्हणाले.
निवडणूक प्रचारात हेलिकॉप्टर, चार्टर्ड विमानांचा वापर कोणी केला? कोट्यवधी रुपये कुठून आले? निवडणूक आयोगाने याकडे डोळेझाक का केली? असे सवालही त्यांनी उपस्थित केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘असली शिवसेना’वर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना राऊत यांनी थेट आव्हान दिले. “आमचे चोरलेले चिन्ह बाजूला ठेवा आणि निवडणुकीला सामोरे जा. मग असली कोण आणि नकली कोण याचा फैसला होईल,” अशा शब्दांत त्यांनी शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.




















