जळगाव मिरर | २३ डिसेंबर २०२५
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील युतीची अधिकृत घोषणा उद्या, बुधवार दि. २४ रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ही माहिती दिली.
राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून, देशाचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंचे एकत्र येणे मुंबईच्या राजकारणात महत्त्वाचे मानले जात आहे.
खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एकत्रित फोटो शेअर करत ‘उद्या १२ वाजता’ असे कॅप्शन दिले आहे. या फोटोमध्ये ठाकरे बंधूंच्या हातात गुलाबांच्या फुलांचा मोठा गुच्छ दिसत असून, युतीची औपचारिक घोषणा पत्रकार परिषदेत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजप नेते राम कदम यांनी टीका केली आहे. राज ठाकरे यांनी पक्ष सोडला नसून उद्धव ठाकरे यांनीच त्यांना पक्ष सोडायला भाग पाडले होते. आता गरज असल्याने उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या दारी गेले आहेत, असा आरोप त्यांनी केला. तसेच, कोविड काळातील कारभारावरही त्यांनी टीका करत, ही युती फारशी प्रभावी ठरणार नाही, असा दावा केला.
दरम्यान, ठाकरे बंधूंच्या या युतीमुळे मुंबईच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबई महानगरपालिकेच्या एकूण २२७ प्रभागांसाठी जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला देखील समोर आला आहे. त्यानुसार ठाकरे गट १४५ ते १५० जागांवर, महाराष्ट्र नवनिर्माण सेना ६५ ते ७० जागांवर, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) १० ते १२ जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे. उद्या होणाऱ्या या घोषणेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, मुंबई महापालिका निवडणुकीच्या राजकारणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.




















