इलेक्ट्रिक शेगडीच्या तांब्याच्या क्वाइलने डोक्यात मारून दुखापत; बापलेकांविरुद्ध गुन्हा
जळगाव मिरर | २४ डिसेंबर २०२५
दुकानाजवळ लघुशंका करून घाण करीत असल्याच्या संशयावरून दोन व्यापाऱ्यांत जोरदार वाद झाला. या वादातून एका व्यापाऱ्याने दुसऱ्या व्यापाऱ्याच्या डोक्यात इलेक्ट्रिक शेगडीची तांब्याची क्वाइल मारून गंभीर दुखापत केल्याची घटना सोमवारी दुपारी १२.१५ वाजता सेंट्रल फुले मार्केटमध्ये घडली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात मारहाण करणारा व्यापारी व त्याचा मुलगा अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अमर चेतनदास कारडा (वय ३७, रा. सिंधी कॉलनी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, घनश्याम पोपली व त्यांचा मुलगा शेखर पोपली यांनी कारडा हे दुकानाजवळ लघुशंका करीत असल्याचा संशय घेत शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. वाद अधिक चिघळल्यानंतर शेखर पोपलीने त्याच्या ‘सतनाम इलेक्ट्रिकल्स’ या दुकानातील इलेक्ट्रिक शेगडीची तांब्याची क्वाइल उचलून कारडा यांच्या डोक्यात मारली.
या हल्ल्यात अमर कारडा यांच्या डोक्याला दुखापत झाली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर शहर पोलिसांनी घनश्याम पोपली व शेखर पोपली या बापलेकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस कर्मचारी इंदल जाधव करीत आहेत.




















