जळगाव मिरर | २५ डिसेंबर २०२५
वरणगाव-विल्हाळे-किन्ही रस्त्यावर बुधवारी (दि. २४) दुपारी घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण वरणगाव शहर हादरून गेले. ट्रॅक्टर उलटून झालेल्या या अपघातात ट्रॅक्टर चालक वडील आणि त्याचा सात वर्षीय चिमुकला मुलगा यांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन मजूर जखमी झाले. या हृदयद्रावक घटनेमुळे सिद्धेश्वर नगरसह परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वरणगाव येथील सिद्धेश्वर नगरमध्ये वास्तव्यास असलेले संजय श्रावण साबळे (वय ४०) हे आपल्या ट्रॅक्टरद्वारे किन्ही शिवारातील गिट्टी मशीनवर ‘कच’ आणण्यासाठी निघाले होते. त्यांच्यासोबत त्यांचा सात वर्षीय मुलगा यश संजय साबळे तसेच मजूर अक्षय संतोष मोरे (वय २५) व किशोर श्रावण साबळे (वय ३०) हे प्रवास करत होते. ट्रॅक्टर विल्हाळे-किन्ही रस्त्याने जात असताना अचानक तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर रस्त्यावरच पलटी झाला. अपघात इतका भीषण होता की ट्रॅक्टरखाली दबल्या गेल्याने चालक संजय साबळे व त्यांचा चिमुकला मुलगा यश यांचा जागीच मृत्यू झाला. काही क्षणांतच आनंदी कुटुंबावर काळाने घाला घातल्याने घटनास्थळी उपस्थित असलेले नागरिक सुन्न झाले. या अपघातात मजूर अक्षय मोरे हा गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने जळगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अन्य जखमीवरप्राथमिक उपचार करण्यात आले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच नवनिर्वाचित नगरसेवकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. अपघातानंतर वरणगाव ग्रामीण रुग्णालयात नातेवाइकांनी मोठी गर्दी केली होती. बाप-लेकाचा एकाच वेळी मृत्यू झाल्याचे समजताच कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. कामासाठी घराबाहेर पडलेल्या पित्याबरोबर निष्पाप मुलाचाही जीव गेल्याने साबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संजय साबळे हे कुटुंबाचा आधारस्तंभ होते. त्यांच्या पश्चात पत्नी, कुटुंबीय व नातेवाईक असा मोठा परिवार असून या घटनेमुळे सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वरणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित कुमार बागुल यांनी घटनास्थळी भेट दिली.
किन्ही शिवारात घडलेल्या अपघाताची माहिती भुसावळ तालुका पोलिसांना देण्यात आली असून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे. वडिलांसोबत कामानिमित्त प्रवास करत असताना काळाने अचानक झडप घातली. निष्पाप व निरागस हास्याने घर उजळवणारा चिमुकला कायमचा निघून गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अवघ्या सात वर्षांतच त्याची स्वप्ने, खेळ आणि आनंद अपूर्ण राहिले. घटनेची माहिती समजताच नातेवाइकांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. या अपघातामुळे संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला आहे. कामासाठी घराबाहेर पडलेल्या पित्याबरोबर मुलाचाही जीव जाणे हे समाजाला हादरवून टाकणारे आहे.




















