जळगाव मिरर | २५ डिसेंबर २०२५
नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार गावात एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेत दोन तरुण मुलांनी रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले असून, त्यांच्या आई-वडिलांचे मृतदेह घरात झोपलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. त्यामुळे ही सामूहिक आत्महत्या आहे की घातपात, याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
या घटनेत बजरंग रमेश लखे (२२), उमेश रमेश लखे (२५), रमेश होनाजी लखे (५१) आणि राधाबाई रमेश लखे (४४) यांचा मृत्यू झाला आहे. बजरंग व उमेश हे सख्खे भाऊ असून, रमेश व राधाबाई हे त्यांचे आई-वडील आहेत. उमेश लखे हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मुदखेड तालुक्याचा माजी उपाध्यक्ष होता आणि सामाजिक कार्यात सक्रिय होता.
रमेश लखे हे आपल्या कुटुंबासह जवळा मुरार येथे वास्तव्यास होते. अल्पभूधारक असले तरी कष्टाने संसाराचा गाडा ते चालवत होते. मात्र, नेमके काय घडले याचा उलगडा अद्याप झालेला नाही. आज सकाळी बजरंग व उमेश यांनी गावाजवळून जाणाऱ्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. ही बातमी गावात पसरताच ग्रामस्थांनी लखे कुटुंबाच्या घराकडे धाव घेतली. तेथे आई-वडील पलंगावर मृतावस्थेत आढळून आल्याने सर्वांनाच धक्का बसला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चारही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. पोलिस निरीक्षक दत्तात्रय मंठाळे यांनी सांगितले की, मुलांनी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली असून, आई-वडील घरात मृतावस्थेत आढळले आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, न्यायवैद्यक पथकाला पाचारण करण्यात आले आहे. कौटुंबिक वाद, आर्थिक अडचणी किंवा अन्य कोणता घातपात झाला आहे का, या सर्व शक्यतांचा तपास केला जात आहे. एकाच कुटुंबातील चार जणांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत असून, परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिस तपासानंतरच या भीषण घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.




















