जळगाव मिरर | २६ डिसेंबर २०२५
अमळनेर शहरातील दुकानदारांना विविध वस्तूंचा वास देत गुंगी आणून त्यांच्याकडून पैसे व मौल्यवान वस्तू लुटणाऱ्या साधूंच्या वेशातील टोळीला अमळनेरात नागरिकांनी रंगेहाथ पकडले. संतापलेल्या नागरिकांनी या बहिरूपी साधूंना चांगलाच चोप देत पोलिसांच्या हवाली केले. ही घटना दि. २५ रोजी शहरात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, धुळे रोडवरील तुळजाई हॉस्पिटल परिसरातील समर्थ ट्रेडिंगचे संचालक जितेंद्र पाटील यांच्या दुकानात चार जण साधूंच्या वेशात आले. त्यांनी टिळा लावण्याच्या बहाण्याने संवाद साधत कशातरी सुगंधाच्या नावाखाली गुंगी आणणाऱ्या पदार्थाचा वापर करून फसवणुकीचा प्रयत्न केला. त्यानंतर एका साधूने बळजबरीने दुकानात प्रवेश करून गल्ल्यातील सुमारे ५ हजार रुपये रोख तसेच काही वस्तू हडप केल्या.
हा प्रकार लक्ष्मी प्रिंटिंगचे संचालक अतुल भदाणे यांच्यासह सनी पाटील, कार्तिक चौधरी, मेहुल चौधरी व शेषनाथ बागुल यांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ हस्तक्षेप करत दुकानदाराला सावध केले. नागरिकांनी साधूंना पकडून त्यांच्याकडून लुटलेली रक्कम परत मिळवली. दरम्यान, घटनेची माहिती पसरताच परिसरात मोठ्या संख्येने नागरिक जमले आणि त्यांनी या बहिरूपी साधूंना चोप दिला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. संबंधित चारही साधूंना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला नेण्यात आले. चौकशीत हे सर्व आरोपी गुजरात येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, अशा फसवणूक करणाऱ्या टोळ्यांपासून सावध राहावे, अंधश्रद्धेला बळी पडू नये, संशयास्पद प्रकार आढळल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.




















