जळगाव मिरर | २६ डिसेंबर २०२५
जळगाव महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात चांगलीच हालचाल सुरू झाली आहे. विविध प्रभागांमध्ये इच्छुक उमेदवारांनी मोर्चेबांधणीला वेग दिला असून प्रचाराची धग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. याच रणधुमाळीत प्रभाग क्रमांक १९ क मधून एक नाव विशेष चर्चेत आले आहे. माजी उपनगराध्यक्ष वासुदेव परशुराम सोनवणे यांच्या पत्नी व वासुमित्रा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष भूषण सोनवणे यांच्या आई सुमित्रा वासुदेव सोनवणे.
सुमित्रा सोनवणे या यंदाची महापालिका निवडणूक लढविणार असून त्यांच्या तयारीने आता अंतिम टप्पा गाठला आहे. सामाजिक कार्याचा प्रदीर्घ अनुभव, परिसरातील नागरिकांशी असलेला थेट संवाद आणि प्रश्नांची जाण यामुळे त्या मतदारांमध्ये विश्वासार्ह उमेदवार म्हणून ओळखल्या जात आहेत. वासुमित्रा फाऊंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या विविध सामाजिक उपक्रमांमुळे त्यांचा जनसंपर्क अधिक मजबूत झाला आहे.
प्रभाग १९ क मधील नागरी समस्या, मूलभूत सुविधा, महिला सक्षमीकरण तसेच युवकांसाठी विकासाभिमुख उपक्रम यावर लक्ष केंद्रित करण्याचा त्यांचा मानस असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे. सध्या प्रभागात भेटीगाठी, मतदार संवाद आणि संघटनात्मक बांधणीवर भर देण्यात येत असून प्रचाराची रणनीती आखण्याचे काम वेगाने सुरू आहे. एकूणच, जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग १९ क मधून सुमित्रा सोनवणे यांच्या उमेदवारीमुळे राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहे.
अन्यथा प्रभागात होणार बंडखोरी ?
भाजपचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन यांचे सामाजिक कार्यकर्ते भूषण सोनवणे हे निकटवर्तीय असून त्यांचे भाजपकडून दावेदारी मानली जात आहे. मात्र यंदाच्या निवडणुकीत भाजपने संधी न दिल्यास या प्रभागात बंडखोरी देखील नाकारता येत नाही, अशी देखील चर्चा परिसरातील नागरिकांमध्ये सुरु आहे.
सोनवणे परिवार पक्षाशी एकनिष्ठ !
जळगाव नगरपालिकेमध्ये वासुदेव सोनवणे हे नगरसेवक व उपनगराध्यक्षपदाची धुरा देखील सांभाळली आहे तर सन २००३ पासून ते सन २०१७ पर्यंत याच प्रभागात नगरसेविका पदाची धुरा सुमित्राताई वासुदेव सोनवणे यांनी उत्तमरीत्या सांभाळली असून व अनेक वर्षांपासून भाजप एकनिष्ठ आहे.





















