जळगाव मिरर | २८ डिसेंबर २०२५
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून ती गर्भवती राहिल्यानंतर तिचा गर्भपात केल्याप्रकरणी आरोपी मावस काकाला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील ही घटना असून संबंधित अल्पवयीन मुलगी ठाणे येथे चुलत काकाकडे गेलेली असताना आरोपीने तिचा विनयभंग केला. त्यानंतर गावाकडे आल्यानंतरही त्याने तिच्यावर अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. या अत्याचारातून मुलगी गर्भवती राहिली होती. बदनामीच्या भीतीने कुटुंबीयांनी तिचा गर्भपात केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणी अत्याचार करणारा आरोपी, पोलिस काका, पीडित मुलीची आई, आजी तसेच संबंधित डॉक्टरसह एकूण सहा जणांविरुद्ध पाचोरा पोलिस ठाण्यात ८ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली.
सरकार पक्षातर्फे अॅड. पंढरीनाथ चौधरी यांनी काम पाहिले. या प्रकरणात यापूर्वी अटक करण्यात आलेले दोघे आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत असून उर्वरित तीन जणांना पोलिसांनी नोटीस देऊन सोडले आहे. पुढील तपास पाचोरा पोलिस करत आहेत.




















