जळगाव मिरर | २९ डिसेंबर २०२५
जळगाव शहरात नर्सिंगचे शिक्षण घेत असलेल्या १९ वर्षीय विद्यार्थिनीचा अचानक चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. रविवारी दुपारी सुमारे तीन वाजेच्या सुमारास ही घटना शिरसोली रस्त्यावरील देवकर कॉलेज परिसरात घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महिमा चंदन वासनिक (वय १९, रा. देवकर कॉलेज) ही विद्यार्थीनी शहरातील देवकर कॉलेजमध्ये नर्सिंगचे शिक्षण घेत होती. रविवारी दुपारच्या सुमारास कपडे धुतल्यानंतर तिला अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर ती होस्टलवर आली असता अचानक तिला चक्कर येऊन ती जमिनीवर कोसळली.
सोबत असलेल्या मैत्रिणींनी तिला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या अचानक घडलेल्या घटनेमुळे देवकर कॉलेज परिसरात शोककळा पसरली आहे.




















