जळगाव मिरर | ३१ डिसेंबर २०२५
लग्न समारंभात हातात पिस्तूल व तलवार घेऊन नाचणाऱ्या तरुणांचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायर झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा प्रकार धरणगाव येथील भारत गॅस गोडावूनजवळ झालेल्या विवाह सोहळ्यात घडल्याचे निष्पन्न झाले आहे. व्हिडीओची गंभीर दखल घेत धरणगाव पोलिसांचे एक पथक संशयिताच्या शोधार्थ बीडकडे रवाना झाले असून संबंधित तरुणांचा कसून शोध सुरू आहे.
सविस्तर वृत्त असे की, धरणगाव येथील भारत गॅस गोडावून परिसरात आयोजित विवाह सोहळ्यात डीजेच्या तालावर तरुण नाचत होते. यावेळी पोलिसांसारखा पेहराव परिधान केलेल्या एका इसमाने त्याच्याकडील पिस्तूल दुसऱ्या तरुणाच्या हातात दिले. त्यानंतर संबंधित तरुणाने पिस्तूल हवेत उंचावत ‘जलने वालो को जलने दे’ या गाण्यावर नाच करत दहशत निर्माण केली. त्याच वेळी दुसरा युवक हातात तलवार घेऊन ‘तो बाप तो बाप रहेगा’ या गाण्यावर नाचताना दिसून आला.
या प्रकारामुळे विवाह सोहळ्यात उपस्थित असलेल्या पाहुण्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही पाहुण्यांनी हा संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये चित्रीत करून तो सोशल मीडियावर प्रसारित केल्यानंतर हा गंभीर प्रकार उघडकीस आला.
हा व्हिडीओ माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी तात्काळ व्हिडीओची सत्यता पडताळून तो पोलीस अधीक्षकांकडे पाठविला. पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत त्वरित कारवाईचे आदेश दिले.
त्याअनुषंगाने धरणगाव पोलिसांनी व्हिडीओमधील पिस्तूल व तलवार घेऊन नाचणाऱ्या तरुणांची ओळख पटविली आहे. त्यातील पिस्तूल हातात घेऊन नाचणारा तरुण बीड जिल्ह्यातील रहिवासी असून तो नातेवाईकांच्या लग्नासाठी धरणगाव येथे आला असल्याची माहिती पुढे आली आहे. सदर तरुणाच्या शोधासाठी धरणगाव पोलिसांचे पथक बीड येथे रवाना झाले असून पुढील तपास सुरू आहे.




















