जळगाव मिरर | २२ जानेवारी २०२६
जळगाव मनपातील भाजप नगरसेवकांची विभागीय आयुक्त कार्यालयात गट नोंदणी करून परत येत असताना माजी महापौर तथा नवनिर्वाचित नगरसेविका जयश्री महाजन आणि त्यांचे पती नगरसेवक सुनील महाजन यांच्या कारचा मालेगावजवळ भीषण अपघात झाला. बुधवारी रात्री सुमारे आठ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे आणि सर्व प्रवाशांनी सीट बेल्ट लावलेले असल्याने मोठा अनर्थ टळला.
सविस्तर वृत्त असे कि, महानगरपालिकेत निवडून आलेले भाजपचे सर्व ४६ नगरसेवक गट नोंदणीसाठी बुधवारी नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात गेले होते. यामध्ये महाजन दाम्पत्याचाही समावेश होता. गट नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करून परतीच्या प्रवासात मालेगावजवळ भरधाव वेगात जात असताना समोरील वाहनाने अचानक गतिरोधकामुळे जोरात ब्रेक दाबला. त्यामुळे मागून येणारी महाजन यांची कार (क्रमांक एम.एच. ५२ बी ०९९९) थेट समोरील वाहनावर आदळली.
या अपघातात कारच्या दर्शनी भागाचा अक्षरशः चुराडा झाला. कारमध्ये जयश्री महाजन, सुनील महाजन यांच्यासह विनोद मराठे, ललित धांडे आदी पाच जण प्रवास करत होते. सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. अपघाताची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. महाजन दाम्पत्य सुरक्षित असल्याचे समजताच भाजप कार्यकर्ते व समर्थकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.




















