जळगाव मिरर | २२ जानेवारी २०२६
अतिवृष्टी, सततची नापिकी, शेतीमालाला योग्य भाव न मिळणे आणि डोक्यावर वाढत चाललेला कर्जाचा भार यामुळे पारोळा तालुक्यातील चोरवड येथील एका ४५ वर्षीय शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. उपचार सुरू असतानाच मंगळवारी (दि. २१) दुपारच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, वाल्मीक अजबराव पाटील (वय ४५, रा. चोरवड, ता. पारोळा) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सतत होणारी नापिकी, कधी अतिवृष्टी तर कधी अपुरा पाऊस, तसेच शेतीमालाला बाजारात योग्य दर न मिळाल्याने पाटील हे गेल्या काही काळापासून आर्थिक अडचणीत होते. याशिवाय त्यांच्यावर सेंट्रल बँकेचे सुमारे दोन लाख रुपयांचे पीक कर्ज होते.
या तणावातूनच त्यांनी १८ जानेवारी रोजी स्वतःच्या शेतात विषारी औषध सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच नातेवाईकांनी त्यांना तत्काळ धुळे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच २१ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.
या प्रकरणी धुळे येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वाल्मीक पाटील यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने चोरवड परिसरात हळहळ व्यक्त होत असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे.




















