जळगाव मिरर | २३ जानेवारी २०२६
पाचोरा शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पाचोरा येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. ही धक्कादायक घटना मे ते नोव्हेंबर दरम्यान काकणबर्डी ते अंतुर्ली रस्त्यालगत असलेल्या शेतात घडली. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध पोस्कोतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन जणांना अटक करण्यात आली असून एक संशयित पसार झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलीला फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमांसह पोस्को कायद्याच्या कलम ५ (ग), ५ (ल), ६, ८ व १२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा नोंद झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आहे. तसेच पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे हे करीत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तपासचक्रे फिरवित दोन संशयित आरोपींना अटक केली असून एक संशयित अद्याप पसार आहे.




















