जळगाव मिरर | २३ जानेवारी २०२६
राज्यात आणि केंद्रात सत्तेत एकत्र असलेले भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) बदलापूर शहरात मात्र परस्परविरोधात उभे ठाकल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. बदलापूर पश्चिमेतील सोनिवली परिसरात माघी गणपतीच्या दर्शनावेळी शिवसेना शिंदे गटाचे स्वीकृत नगरसेवक हेमंत चतुरे यांना भाजपच्या पदाधिकाऱ्याने आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याची गंभीर घटना घडली आहे. विशेष म्हणजे, ही संपूर्ण घटना सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्यामुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
ही घटना सोनिवली येथील आत्मिया हाइट्स या गृहनिर्माण संकुलात घडली. माघी गणपतीच्या दर्शनासाठी हेमंत चतुरे गेले असता भाजप पदाधिकारी तेजस मस्कर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना अडवले. सुरुवातीला शाब्दिक वाद झाला, मात्र काही क्षणांतच हा वाद हाणामारीत रूपांतरित झाला. उपस्थित नागरिक पाहत असतानाच चतुरे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. या प्रकारामुळे सोसायटी परिसरात एकच खळबळ उडाली.
या मारहाणीचा थरार सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे कैद झाला असून, व्हिडीओमध्ये भाजप पदाधिकारी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून चतुरे यांना घेरून मारहाण केली जात असल्याचे दिसत आहे. हे फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होताच बदलापूरच्या राजकीय वर्तुळात संतापाची लाट उसळली आहे. सत्ताधारी पक्षांचे कार्यकर्ते खुलेआम हिंसाचार करत असतील, तर सामान्य नागरिकांची सुरक्षितता काय, असा सवाल उपस्थित होत आहे.
या घटनेमागे राजकीय जळफळाट असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाने केला आहे. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत हेमंत चतुरे यांचा भाजपच्या उमेदवाराकडून पराभव झाला होता. मात्र, त्यानंतर शिवसेना शिंदे गटाने त्यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी दिली. ही बाब भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना खटकली असून त्यातूनच हा हल्ला झाल्याचा आरोप शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी संजय जाधव यांनी केला आहे.
मारहाणीत जखमी झालेले हेमंत चतुरे यांना तातडीने बदलापूरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या अंगावर गंभीर दुखापती झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच शिवसेना शिंदे गटाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते रुग्णालयात दाखल झाले. यावेळी वातावरण तणावपूर्ण झाले होते. आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी शिवसेना कार्यकर्त्यांनी केली आहे.
दरम्यान, बदलापूर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे. आरोपींविरोधात गुन्हा दाखल होणार का आणि त्यांच्यावर नेमकी काय कारवाई होते, याकडे संपूर्ण बदलापूर शहराचे लक्ष लागले आहे. सत्ताधारी मित्रपक्षांतील हा संघर्ष कुठवर जाणार, याबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.





















