जळगाव मिरर | २४ जानेवारी २०२६
तालुक्यातील आव्हाणे येथे २२ जानेवारी रोजी रात्री झालेल्या किरकोळ वादातून सागर अरुण बिन्हाडे (वय अंदाजे …) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिसांनी मुख्य संशयित आरोपी सुमीत उर्फ टक्या उमेश सपकाळे (वय २०) याला शुक्रवारी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या घटनेत इतरही काही जणांचा सहभाग असल्याचा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला असून त्यांनी याबाबत पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आहे.
२२ जानेवारी रोजी रात्री सुमारे ९ वाजेच्या सुमारास आव्हाणे गावात किरकोळ कारणावरून वाद होऊन हाणामारी झाली. या हाणामारीदरम्यान संशयित आरोपी सुमीत उर्फ टक्या सपकाळे याने सागर बिन्हाडे यांना बेदम मारहाण केली. मारहाणीत गंभीर दुखापत झाल्याने सागर यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर मयताची पत्नी रेखा बिन्हाडे यांच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवारी पोलिसांनी मुख्य संशयित आरोपीला अटक केली असली, तरी या हत्येमागे इतरही संशयितांचा हात असल्याचा दावा नातेवाईकांनी केला असून, सर्व आरोपींना अटक करण्याची मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे. प्रकरणाचा पुढील तपास जळगाव तालुका पोलीस करीत आहेत.




















