जळगाव मिरर | २४ जानेवारी २०२६
जुने जळगाव येथे गेल्या अनेक दिवसांपासून आजाराशी झुंज देणाऱ्या ३४ वर्षीय तरुणाने घरात कुणीही नसताना गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली. गणेश समाधान अहिरे (वय ३४, रा. जुने जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश अहिरे हा आपल्या आईसोबत जुने जळगाव परिसरात राहत होता. तो काही दिवसांपासून गंभीर आजारी असल्याने शारीरिक व मानसिक त्रासात होता. शुक्रवारी (दि. २३) त्याची आई काही कामानिमित्त घराबाहेर गेली असताना, घरात एकटाच असलेल्या गणेशने टोकाचे पाऊल उचलले.
आई घरी परतल्यानंतर गणेश बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी आक्रोश केला. परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत गणेशला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.




















