जळगाव मिरर | २५ जानेवारी २०२६
सहा महिन्यांपूर्वी भाडेतत्त्वावर घेतलेल्या घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर मानव तस्करी विरोधी पथक (एएचटीयू) व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने छापा टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत देहविक्रीसाठी डांबून ठेवलेल्या अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली असून कुंटणखाना चालविणाऱ्या विजय सखाराम तायडे (वय ३२, रा. हनुमान नगर, खेडी शिवार) याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई दि. २३ रोजी रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास करण्यात आली. या धाडसी कारवाईचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खेडी शिवारातील हनुमान नगर परिसरात विजय तायडे याने भाडेतत्त्वावर एक घर घेतले होते. या घरात तो गेल्या काही महिन्यांपासून एका अल्पवयीन मुलीला डांबून ठेवून कुंटणखाना चालवित असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे दि. २३ रोजी मानव तस्करी विरोधी पथक व स्थानिक गुन्हे शाखेचे संयुक्त पथक तयार करण्यात आले.
रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास पथकाने डमी ग्राहक पाठवून सापळा रचला. डमी ग्राहकाने मिसकॉल दिल्यानंतर तत्काळ कारवाई करत पथकाने संबंधित घरावर छापा टाकला. छाप्यात घरातून अल्पवयीन मुलीसह कुंटणखाना चालविणाऱ्या विजय तायडे याला ताब्यात घेण्यात आले. पीडित मुलीची चौकशी केली असता, संशयित तायडे याने तिला घरात डांबून ठेवून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वेश्या व्यवसाय करवून घेतल्याचे तिने सांगितले.
या प्रकरणी कुंटणखाना चालक विजय सखाराम तायडे (रा. हनुमान नगर, खेडी शिवार) याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्यात पोक्सो कायद्याच्या कलमांची भर घालण्यात आली आहे. विशेष म्हणजे, तायडे याच्याविरुद्ध यापूर्वीही कुंटणखाना चालविणे व वेश्या व्यवसाय करवून घेतल्याप्रकरणी तीन गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मानव तस्करी विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे, एलसीबीचे उपनिरीक्षक शरद बागल, सहायक फौजदार अतुल वंजारी, संजय हिवरकर, पोहेकॉ नितीन बाविस्कर, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, विजय पाटील, किशोर पाटील, राहुल रगडे, रविंद्र कापडणे, रविंद्र पाटील, रविंद्र गायकवाड, अनिल पाटील तसेच महिला कर्मचारी निलीमा सुशीर, भुषण कोल्हे, वहिदा तडवी, राहुल वानखेडे यांच्या पथकाने केली.




















