जळगाव मिरर | २९ जानेवारी २०२६
जळगाव शहर तहसील कार्यालयात दररोज शेकडो नागरिक विविध शासकीय कामांसाठी येत असतात. यामध्ये दिव्यांग नागरिकांची संख्याही मोठी आहे. मात्र, या तहसील कार्यालयात दिव्यांग नागरिकांना थेट अधिकारी व कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे. याबाबत एका दिव्यांग नागरिकाने आपली व्यथा मांडत प्रशासनाच्या दुर्लक्षाकडे लक्ष वेधले आहे.
जळगाव शहरातील बळीराम पेठ परिसरात असलेल्या तहसील कार्यालयात शहरासह तालुक्यातील नागरिक उत्पन्न, जात, रहिवासी, तसेच इतर महत्त्वाच्या दाखल्यांसाठी येतात. मात्र, या कार्यालयात दिव्यांग नागरिकांसाठी आवश्यक सोयी-सुविधांचा अभाव दिसून येतो. कार्यालयाच्या आतमध्ये असलेल्या उंच पायऱ्यांमुळे दिव्यांग नागरिकांना आत जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. व्हीलचेअर वापरणाऱ्या किंवा चालण्यास अडचण असलेल्या दिव्यांग बांधवांसाठी ही परिस्थिती अधिकच त्रासदायक ठरत आहे.
दुसरीकडे, तहसील कार्यालयातील काही अधिकारी आणि कर्मचारी दिव्यांग नागरिकांना छोट्या-मोठ्या कागदपत्रांसाठी वारंवार कार्यालयात बोलावत असल्याची तक्रारही नागरिकांकडून केली जात आहे. त्यामुळे दिव्यांग नागरिकांना अनेकदा अनावश्यक फेऱ्या माराव्या लागत असून, त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे दिव्यांग बांधवांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
दिव्यांग नागरिकांचे म्हणणे आहे की, शासनाने त्यांच्या सोयीसाठी विविध योजना आणि नियम आखले असले तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीत मात्र उदासीनता दिसून येते. तहसील कार्यालयासारख्या महत्त्वाच्या शासकीय ठिकाणी रॅम्प असणे आवश्यक असताना आजही दिव्यांगांना उंच पायऱ्या चढण्यास भाग पाडले जाते, ही बाब दुर्दैवी असल्याची भावना व्यक्त होत आहे.
तहसील कार्यालयात येणाऱ्या दिव्यांग बांधवांना किमान तत्काळ सेवा देऊन त्यांची कामे एकाच वेळी पूर्ण करावीत, तसेच त्यांचा वेळ आणि श्रम वाचवावेत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देऊन दिव्यांगांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.





















