जळगाव मीरर | २१ फेब्रुवारी २०२६
पोलिस असल्याची बतावणी करत ‘पुढे खून झाला असून तिकडे जाऊ नका’ असे सांगून तीन अज्ञात भामट्यांनी ६५ वर्षीय वृद्धेची १ लाख ५६ हजार ९३१ रुपयांचे सोन्याचे दागिने फसवणुकीने लंपास केल्याची घटना १० फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता जुने जळगावातील भाग्यलक्ष्मी चौकात घडली. या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रामपेठ येथील रहिवासी कमलबाई एकनाथ सोनार (वय ६५) या १० फेब्रुवारी रोजी दुपारी भाग्यलक्ष्मी चौक परिसरात कीर्तन ऐकण्यासाठी जात होत्या. त्यावेळी एका अनोळखी व्यक्तीने त्यांना थांबवून ‘पोलिस खात्यातील साहेब तुम्हाला बोलावत आहेत’ असे सांगितले. संशय न बाळगता त्या रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या साध्या वेशातील व्यक्तीकडे गेल्या. त्या व्यक्तीने ‘पुढे खून झाला आहे, तुम्ही तिकडे जाऊ नका’ असे सांगत भीतीचे वातावरण निर्माण केले. तसेच अंगावरील दागिने काढून ठेवण्याचा सल्ला दिला. त्यावर विश्वास ठेवून कमलबाई यांनी गळ्यातील सोन्याची चेन काढून दिली. हातातील सोन्याच्या बांगड्या निघत नसल्याने समोरील व्यक्तीने मदत करण्याच्या बहाण्याने त्या देखील काढून घेतल्या.
यानंतर दागिने कागदात गुंडाळून वृद्धेच्या हातातील पिशवीत ठेवण्यात आले. काही अंतर पुढे गेल्यानंतर कमलबाई यांनी पिशवीतील कागद उघडून पाहिला असता त्यामध्ये दागिन्यांऐवजी दगड आढळून आले. तोपर्यंत तिन्ही भामटे पसार झाले होते. या घटनेनंतर कमलबाई सोनार यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे.
दरम्यान, अशा प्रकारे पोलिस असल्याचे भासवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळ्यांचा सक्रियपणा वाढल्याने ज्येष्ठ नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी, अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये आणि कोणतीही शंका असल्यास त्वरित अधिकृत पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.




















