
जळगाव मिरर | २९ एप्रिल २०२६
जळगावकडून कुसुंब्याकडे जाणाऱ्या मार्गावर रेमंड चौफुलीजवळ मंगळवारी मध्यरात्री भीषण अपघात घडला. अज्ञात वाहनाने कारला जोरदार धडक दिल्याने कारचालकासह एका महिलेचा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रात्री सुमारे १२:४५ वाजेच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, (एमएच १२ वाय.ए. ८१७) क्रमांकाची कार कुसुंब्याकडे जात असताना रेमंड चौफुलीजवळ अचानक अज्ञात वाहनाने समोरून जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका जबर होता की कारचे मोठे नुकसान झाले असून, वाहनातील चालक आणि महिला गंभीर जखमी झाले. अपघात घडताच परिसरातील इतर वाहनचालकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. तसेच एमआयडीसी पोलिसांनाही घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, अपघातानंतर काही काळ घटनास्थळी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी तत्परता दाखवत वाहतूक सुरळीत केली. या अपघातातील जखमींची नावे अद्याप समजू शकली नसून, संबंधित अज्ञात वाहनाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू होती.






















