
जळगाव मिरर | २९ एप्रिल २०२६
जळगाव जिल्ह्यातील फैजपूर आणि वरणगाव परिसरात गॅस एजन्सींच्या गोडाऊन फोडून मोठ्या प्रमाणात सिलेंडर चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ४ लाख २७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही माहिती पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या जनसंपर्क विभागाने दिली.
फैजपूर पोलीस स्टेशन हद्दीतून १०० गॅस सिलेंडर तर वरणगाव पोलीस स्टेशन हद्दीतून ५७ गॅस सिलेंडर चोरीला गेल्याने परिसरात खळबळ उडाली होती. या गंभीर गुन्ह्यांची दखल घेत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तातडीने कारवाईचे आदेश दिले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि घटनास्थळावरील तपासाच्या आधारे संशयास्पद वाहनांचा मागोवा घेतला. या तपासातून पोलिसांनी शेख बिलाल शेख नबी (वय ३२, रा. कासोदा), वसीम खान शाबीर खान (वय ३१, रा. तांबापुरा) आणि चेतन सुरेश काळे (वय ३८, रा. नशिराबाद) या तिघांना ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्या ताब्यातून ६२ भरलेले गॅस सिलेंडर, ९५ रिकामे गॅस सिलेंडर आणि गुन्ह्यात वापरलेली सुझुकी बर्गमन मोपेड जप्त करण्यात आली आहे. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ४ लाख २७ हजार ५०० रुपये इतकी आहे. सध्या आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी फैजपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दीन सैय्यद आणि विनोद गाभणे करीत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या या धडाकेबाज कारवाईमुळे परिसरातील चोरट्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.





















