
जळगाव मिरर | ३० एप्रिल २०२६
एरंडोल येथूनजवळच असलेल्या भालगाव फाट्यानजीक आज धुळ्याकडून अकोल्याकडे भरधाव वेगाने जाणारी बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुभाजकावर आदळली. या अपघातात बसमधील सर्व १८ प्रवाशी जखमी झाले असून या अपघातात चालक गंभीररित्या जखमी झाला आहे. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शहरापासून काही अंतरावरील भालगाव फाट्याजवळ आज सकाळी धुळ्याहून भुसावळकडे जाणाऱ्या एसटी बस (एमएच- २०, बिएल- ३४१२) चा भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या बसवरील चालकाचे अचानक नियंत्रण सुटल्यामुळे बस रस्त्यालगतच्या डिव्हायडरला जोरात धडकली. या अपघातात एकूण १८ प्रवासी जखमी झाले असून काहि प्रवाशांना गंभीर इजा झाली आहे. या अपघातग्रस्त बसमध्ये १५ प्रवासी, १ चालक, १ वाहक आणि राज्य परिवहन महामंडळाचा १ कर्मचारी असे एकूण १८ जण प्रवास करत होते.
या अपघातानंतर प्रवाशांमध्ये मोठा गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दुर्घटनेत चालकाच्या पायाला गंभीर इजा झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बसवरील नियंत्रण अचानक सुटल्यामुळेच हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दरम्यान, या अपघाताच्या पार्श्वभूमीवर रस्त्याचे सुरू असलेले काम, डिव्हायडरची रचना, तसेच बस चालकांवर असलेला कामाचा ताण, या सर्व बाबींचा सखोल विचार करणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. वारंवार घडणाऱ्या अशा अपघातांना आळा घालण्यासाठी संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी व्यक्त होत आहे.





















