
मुक्ताईनगर प्रतिनिधी | प्रणित काठोके
मुक्ताईनगर व बोदवड येथील खरीप हंगामपूर्व आढावा बैठक आमदार श्री. चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तहसील सभागृह, मुक्ताईनगर येथे पार पडली. या बैठकीत खरीप हंगामाचे नियोजन, सध्याची दुष्काळी परिस्थिती आणि आगामी उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीस मुक्ताईनगरचे तहसीलदार श्री. गिरीश बखारे, बोदवडचे तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे, तालुका कृषी अधिकारी मुक्ताईनगर श्री. प्रमेश शेळत, बोदवडचे कृषी अधिकारी श्री. अनिल गावित, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ श्री. नेहेत, डॉ. राकेश कापडणे, श्रीमती भाग्यश्री चौधरी तसेच आयडीबीआय बँकेचे शाखा व्यवस्थापक श्री. सावेळ दत्ता यांच्यासह कृषी विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत अवजारे व प्रमाणपत्रांचे वितरणही करण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात आमदार श्री. चंद्रकांत पाटील यांनी खरीप हंगामाच्या नियोजनावर मार्गदर्शन करताना सध्याच्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिल्या. तसेच आगामी हंगामात शेतकऱ्यांना खत व बियाण्यांची मुबलक उपलब्धता राहील यासाठी योग्य नियोजन करण्याचे निर्देश दिले.
यानंतर तालुका कृषी अधिकारी मुक्ताईनगर व बोदवड यांनी नियोजन-२०२६ संदर्भात PPT सादरीकरण करून तालुक्यातील कृषी परिस्थिती व तयारीची माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक कृषी अधिकारी श्री. तात्यासाहेब कारंडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन मंडळ कृषी अधिकारी श्री. गजानन निमकडे यांनी मानले. बैठकीची सांगता अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.





















