
जळगाव मिरर | ६ मे २०२६
भारतीय जनता पार्टीच्या जळगाव महानगर जिल्हा हॉकर्स आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी विजय पिंगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या आदेशानुसार ही नियुक्ती जाहीर करण्यात आली असून भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे , राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, विभागीय संघटनमंत्री रविंद्र अनासपुरे तसेच खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश (राजूमामा) भोळे, आमदार मंगेश चव्हाण आणि आमदार अमोल जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली आहे.
विजय पिंगळे हे भाजपचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. पक्ष संघटनेत विविध जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या असून त्यांच्या संघटन कौशल्याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे. पक्षनिष्ठा, संघटनात्मक कार्य आणि कार्यकर्त्यांशी सातत्याने असलेला संपर्क यामुळे त्यांची नियुक्ती महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
भाजपच्या विचारसरणीवर विश्वास ठेवत ‘राष्ट्र प्रथम’, ‘एकात्म मानवतावाद’, ‘अंत्योदय’ आणि मूल्याधारित राजकारण या तत्त्वांनुसार कार्य करत संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची अपेक्षा पक्ष नेतृत्वाने व्यक्त केली आहे. तसेच केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, विजय पिंगळे यांच्या नियुक्तीनंतर भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून पुढील संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.




















