
जळगाव मिरर | ९ मे २०२६
पावसाळा तोंडावर आलेला असताना शहरात नागरी सुविधांची दैना उडू नये, यासाठी जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. महापौरांनी त्यांच्या दालनात बांधकाम विभागाची तातडीची बैठक बोलावून पावसाळापूर्व कामांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासह धोकादायक झाडे व फांद्या हटवण्याचे स्पष्ट आदेश त्यांनी प्रशासनाला दिले.
धोकादायक झाडे आणि फांद्यांचा प्रश्न: पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे झाडे पडून दुर्घटना होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी रस्त्यांवरील सर्व धोकादायक झाडे, फांद्या आणि विजेच्या तारांना स्पर्श करणाऱ्या फांद्या तातडीने तोडण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत.
रस्ते दुरुस्ती आणि खड्डे मुक्ती: शहरातील मुख्य रस्ते आणि अंतर्गत रस्त्यांवर पडलेले मोठे खड्डे बुजवून त्यांची डागडुजी करण्याचे काम प्राधान्याने हाती घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. जेणेकरून पावसाळ्यात वाहनधारकांची गैरसोय होणार नाही.
नगरसेवकांच्या प्रस्तावांना गती: विविध प्रभागांतील नगरसेवकांनी रस्ते आणि गटारींच्या कामांबाबत जे प्रस्ताव सादर केले आहेत, त्या प्रस्तावांवर विलंब न लावता तातडीने ‘इस्टिमेट’ (अंदाजपत्रक) तयार करण्याचे निर्देश महापौरांनी संबंधित अभियंत्यांना दिले.
या बैठकीत नियोजित कामांचा आराखडा सादर करण्यात आला. यावेळी महापौर दीपमाला काळे यांच्यासह योगेश बोरोले (शहर अभियंता) संदीप मोरे (विद्युत विभाग प्रमुख), बांधकाम विभागातील सर्व कनिष्ठ व शाखा अभियंता आणि संबंधित कर्मचारी उपस्थित होते. शहराचा विकास आणि पावसाळ्यातील आपत्ती निवारण या दोन्ही आघाड्यांवर महापालिकेने आतापासूनच कंबर कसली आहे.






















