
जळगाव मिरर/९ मे २०२६
जळगाव सार्वजनिक बांधकाम विभाग पुन्हा एकदा भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे चर्चेत आला असून, एका मक्तेदाराचे थकीत बिल मंजूर करून देण्यासाठी १५ लाख रुपयांची लाच मागणाऱ्या शाखा अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. योगेश अहिरे असे अटक करण्यात आलेल्या शाखा अभियंत्याचे नाव असून, १५ लाखांच्या मागणीपैकी पहिला हप्ता म्हणून ५ लाख रुपये स्वीकारताना एसीबीच्या पथकाने ही कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार मक्तेदाराने सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आलेल्या कामाचे बिल मंजुरीसाठी सादर केले होते. मात्र, हे बिल मंजूर करण्यासाठी शाखा अभियंता योगेश अहिरे यांनी तब्बल १५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. संबंधित मक्तेदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी थेट नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दाखल केली.
तक्रारीची गंभीर दखल घेत एसीबीच्या अधिकाऱ्यांनी प्राथमिक पडताळणी केली असता लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर शनिवारी दुपारच्या सुमारास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालय परिसरात सापळा रचण्यात आला. तडजोडीनंतर ठरलेली ५ लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना योगेश अहिरे यांना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
या कारवाईनंतर सार्वजनिक बांधकाम विभागात मोठी खळबळ उडाली असून, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातही या घटनेची जोरदार चर्चा सुरू असून, भ्रष्टाचाराविरोधात एसीबीने उचललेल्या या कठोर पावलाचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे.
दरम्यान, या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, लाचेच्या व्यवहारामागे मोठे रॅकेट कार्यरत होते का, याचा तपास एसीबीकडून सुरू करण्यात आला आहे. संबंधित अधिकाऱ्याच्या संपत्तीची आणि इतर व्यवहारांचीही चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






















