
जळगाव मिरर | १० मे २०२६
आयपीएल क्रिकेट सामन्यांवर ऑनलाईन सट्टा लावणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जामनेर शहरातील हिवरखेडा रोड परिसरातील एका घरावर छापा टाकला. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल, टीव्ही, एटीएम कार्डसह तब्बल १० लाख ५३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चार जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, जामनेर पोलीस स्टेशन हद्दीतील हिवरखेडा रोडवरील एका घरात काही इसम आयपीएल क्रिकेट सामन्यांवर ऑनलाईन सट्टा लावून जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीच्या पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला.
छाप्यामध्ये पोलिसांनी ९ लाख २ हजार ३०० रुपयांची रोख रक्कम, १ लाख ३० हजार रुपये किमतीचे मोबाईल फोन, २५ हजार रुपये किमतीचा टीव्ही व साउंड बार, तसेच ४१ एटीएम कार्ड असा मुद्देमाल जप्त केला. याशिवाय सट्टा व्यवहाराशी संबंधित इतर साहित्यही पोलिसांच्या हाती लागले आहे.
या प्रकरणी देवानंद सुभाष सोनवणे, रितेश अशोक नेरकर, परीक्षित रविंद्र पाटील आणि प्रवीण जगन्नाथ टहाकडे (सर्व रा. जामनेर) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींविरोधात जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २३६/२६ नुसार महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम ४ व ५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईल आणि एटीएम कार्डच्या आधारे सट्टा नेटवर्कची व्याप्ती तपासली जात असून या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग आहे का, याचाही शोध सुरू आहे.






















