
जळगाव मिरर | १३ मे २०२६
मान्सूनच्या पार्श्वभूमीवर शहरात पाणी साचण्याची समस्या उद्भवू नये, यासाठी जळगाव महानगरपालिकेने पावसाळापूर्व नालेसफाईच्या कामाला सुरुवात केली आहे. बुधवारी महापौर दीपमाला काळे यांनी मेहरुण परिसरातील नालेसफाईच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासनाला सूचना दिल्या.
महापौरांच्या सूचना अन् कामाला गती
शहरातील मुख्य नाले आणि उपनाले वेळेत स्वच्छ व्हावेत, जेणेकरून पावसाळ्यात पाण्याचा निचरा सुरळीत होईल, असे निर्देश महापौरांनी दिले आहेत. या सूचनेनंतर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने तातडीने कंबर कसली असून, सहाय्यक उपायुक्त उदय पाटील व मुख्य आरोग्य निरीक्षक रमेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सफाई कर्मचाऱ्यांनी ठिकठिकाणी कामकाज सुरू केले आहे.
विविध प्रभागांत स्वच्छता मोहीम
बुधवारी दिनांक १३ रोजी शहरातील विविध भागात विशेष मोहीम राबवण्यात आली. मेहरुण परिसर: विविध लहान-मोठ्या नाल्यांची सफाई जेसीबीन साफसफाई करण्यात आली. छत्रपती शिवाजीनगर: साचलेला कचरा आणि गाळ उपसण्याचे काम झाले. प्रभाग क्रमांक १२ (रामदास कॉलनी): या भागातही स्वच्छता पथकाद्वारे नालेसफाई पूर्ण करण्यात आली. नालेसफाईसाठी सहा जेसीबी व एक पोकलँडची मदत घेण्यात आली.
नालेसफाईच्या या पाहणी दौऱ्यात लोकप्रतिनिधी आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी यांच्यासह स्थानिक नगरसेवक राजेंद्र घुगे पाटील, गणेश सोनवणे, सहाय्यक उपायुक्त उदय पाटील, मुख्य स्वच्छता निरीक्षक रमेश कांबळे आणि समीर बोरोले यांचा समावेश होता.
“शहरात कुठेही पावसाचे पाणी साचून नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पावसाळापूर्व नालेसफाईचे काम युद्धपातळीवर आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या आहेत.”
— दीपमाला काळे, महापौर, जळगाव.






















