नवी दिल्ली : वृत्तसंस्था
माणूस आनंदाच्या भरात असं काही करून जातो, ज्याचा त्याला नंतर चांगलाच पश्चाताप होतो. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. दिल्लीच्या सीलमपूर परिसरात शनिवारी संध्याकाळी मुलाच्या जन्मादिवसाचा आनंद साजरा करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात आनंदात केलेल्या हवाई गोळीबारात तीन मुलं जखमी झाली. जखमी मुलांना जवळच्या जीटीबी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.
पोलिसांनी सांगितलं की, गोळीबारात तीन मुलं जखमी झाल्याची माहिती त्यांना सायंकाळी सातच्या सुमारास मिळाली. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, माहिती मिळाल्यानंतर पोलीस जे ब्लॉक झोपडपट्टी भागात पोहोचले, जिथे कुतुबुद्दीनने आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. समारंभादरम्यान अमीर उर्फ हमजा याने हवेत एक गोळी झाडली, जी जमिनीवर आदळली आणि जवळच खेळत असलेल्या दोन 7 वर्षांच्या मुलांच्या पोटाला स्पर्श करत तिसर्या मुलाच्या खांद्यावर लागली, असं अधिकाऱ्याने सांगितलं. त्यांनी सांगितलं की, या तिन्ही मुलांचं वय सात ते आठ वर्षांच्या दरम्यान असून घटनेच्या वेळी ते तिथे खेळत होते.
पोलिसांनी सांगितलं की, मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. त्याचबरोबर आरोपींना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, आरोपी अमीर शेजारीच राहतो. त्याचा शोध सुरू आहे. त्याच्याकडे पिस्तूल कुठून आला याचाही शोध घेतला जात आहे.