जळगाव मिरर | वाढदिवस विशेष लेख
चाळीसगावच्या मातीत जन्म घेऊन, याच मातीतील सामान्य माणसाच्या सुख-दुःखाशी नाते जोडत, जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करत आणि विकासाला लोकचळवळीचे स्वरूप देत आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे नेतृत्व म्हणजे आमदार मंगेशदादा चव्हाण. राजकारण म्हणजे केवळ पद, सत्ता किंवा अधिकार नसून जनतेची सेवा, समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ आणि आपल्या माणसांसाठी सदैव धावून जाण्याची वृत्ती असते, हे आपल्या कार्यातून सिद्ध करणाऱ्या दादासाहेबांचा आज वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याचा विचार केला की, एका व्यक्तीच्या रूपात अनेक भूमिका निभावणारे आणि प्रत्येक भूमिकेला न्याय देणारे संवेदनशील नेतृत्व आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते.


आयुष्यभर संसाराचा गाडा ओढणाऱ्या आपल्या ज्येष्ठ माता-भगिनींना त्यांच्या उतारवयात पंढरीच्या विठुरायाचे दर्शन घडावे, त्यांच्या आयुष्यात आनंदाचा क्षण यावा, या भावनेतून दरवर्षी हजारो ज्येष्ठ नागरिकांना पंढरपूर वारी घडविण्याचे कार्य मंगेशदादांनी सुरू ठेवले आहे. ही केवळ एक यात्रा नसून आयुष्यभर कष्ट करणाऱ्या ज्येष्ठांच्या मनातील विठ्ठलदर्शनाची इच्छा पूर्ण करण्याचा भावनिक प्रयत्न आहे. हजारो ज्येष्ठ मातांच्या आशीर्वादातून दादांना मिळालेली ‘आजच्या घडीचे आधुनिक श्रावणबाळ’ ही उपमा त्यांच्या या सेवाभावाची खरी ओळख आहे.
आजच्या काळात तरुणाईसमोर व्यसनाधीनतेचे मोठे आव्हान उभे आहे. अशा परिस्थितीत दारू-पार्टीचे प्रलोभन न देता तरुणांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, स्वराज्याची प्रेरणा, राष्ट्रभक्ती आणि संस्कार रुजविण्याचा वेगळा मार्ग दादांनी स्वीकारला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून दरवर्षी हजारो तरुणांना रायगडवारी घडवून आणण्याची संकल्पना म्हणजे तरुणाईला सकारात्मक दिशा देणारे प्रभावी पाऊल आहे. रायगडावर जाऊन इतिहास अनुभवणारी आणि शिवरायांच्या विचारांनी प्रेरित होणारी ही तरुणाई म्हणजे भविष्यातील सक्षम समाजाची आशा आहे. त्यामुळे मंगेशदादा हे केवळ राजकीय नेतृत्व नसून तरुणांच्या स्वप्नांना योग्य दिशा देणारे युवानेतृत्व ठरतात.
समाजातील प्रत्येक घटकाचा सन्मान झाला पाहिजे, ही भावना त्यांच्या कार्यातून सातत्याने दिसून येते. आपल्या अंगणवाडी सेविका भगिनींच्या कामाची दखल घेत त्यांना दरवर्षी साडी-चोळीची भेट देणे, तसेच मुलींच्या विवाहासाठी भाऊबीजेच्या रूपाने २५ हजार रुपयांचा आहेर देणे, ही केवळ आर्थिक मदत नाही तर नात्यांची जपणूक आहे. त्यामुळे अनेक अंगणवाडी सेविकांसाठी ते केवळ आमदार नसून त्यांचे भाऊ आहेत, तर विवाहाच्या उंबरठ्यावर असलेल्या मुलींसाठी मायेचा मामा आहेत. राजकीय पदापलीकडे जाऊन माणुसकीची नाती जपण्याची ही परंपरा दादांच्या व्यक्तिमत्त्वाची वेगळी बाजू अधोरेखित करते.
चाळीसगाव तालुक्यातील हजारो नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी आपल्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून विविध सेवा उपलब्ध करून देणारे मंगेशदादा म्हणजे खऱ्या अर्थाने लोकसेवक आहेत. सामान्य माणूस आपल्या प्रश्नासाठी कुठे जाईल, कोणाकडे जाईल, याची चिंता करू नये, त्याला आपलेपणाने ऐकून घेणारा आणि त्याच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न करणारा लोकप्रतिनिधी मिळावा, या भावनेतून त्यांचे जनसंपर्काचे कार्य सुरू आहे. जनतेच्या दारात जाणे, नागरिकांच्या अडचणी समजून घेणे आणि त्या सोडविण्यासाठी प्रशासनाच्या पातळीवर सातत्याने पाठपुरावा करणे ही त्यांच्या कार्यपद्धतीची ओळख बनली आहे.
पाणी हा ग्रामीण भागातील सर्वात जिव्हाळ्याचा आणि जीवनाशी निगडित प्रश्न आहे. गावागावातील पाणीटंचाई दूर व्हावी आणि प्रत्येक नागरिकाला पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेण्यासाठी दादांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. पाणी म्हणजे जीवन आणि प्रत्येक घराला पाणी मिळाले पाहिजे, या भूमिकेतून गावागावात पाण्याची सुविधा निर्माण करण्यासाठी सुरू असलेली धडपड त्यांना चाळीसगावचे ‘आधुनिक भगीरथ’ म्हणून ओळख देणारी आहे.
समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा, ही त्यांची भूमिका आहे. विनाअनुदानित शिक्षक, कोतवाल, पोलीस पाटील, बार्टी तालुका समन्वयक अशा विविध घटकांच्या प्रश्नांसाठी आवाज उठविणे आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी पाठपुरावा करणे, ही दादांच्या कार्याची आणखी एक महत्त्वाची बाजू आहे. ज्यांचा आवाज मोठा नाही, ज्यांच्यामागे मोठी राजकीय ताकद नाही, अशा सामान्य कर्मचाऱ्यांच्या आणि घटकांच्या न्यायासाठी धडपडणारे नेतृत्व म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
कोरोनाच्या संकटाने संपूर्ण जगाला हादरवून सोडले होते. त्या काळात माणूस माणसापासून दूर राहत असताना अनेक जण घरात सुरक्षित होते; मात्र जनतेच्या मदतीसाठी मंगेशदादा रस्त्यावर होते. गरजू नागरिकांना जेवण उपलब्ध करून देणे, कोरोना लसीकरणासाठी मदत करणे, ऑक्सिजनची व्यवस्था करणे आणि संकटात सापडलेल्या नागरिकांना आधार देणे, यासाठी त्यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून काम केले. संकटाच्या काळात लोकांच्या मदतीला धावून जाणारे नेतृत्वच खरे लोकनायक असते आणि कोरोनाकाळातील त्यांची भूमिका याचे ठळक उदाहरण आहे.
चाळीसगाव तालुक्याचा सर्वांगीण विकास व्हावा, शहरासोबत गावागावातही विकासाची गंगा पोहोचावी, या उद्देशाने विविध विकासकामांना मंजुरी मिळवून देण्याचे काम सातत्याने सुरू आहे. गावागावातील रस्ते, स्मशानभूमी, ग्रामपंचायत कार्यालये, तलाठी कार्यालये तसेच विविध मूलभूत सुविधांची कामे मंजूर करून ती पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न त्यांच्या विकासाभिमुख कार्यशैलीचे दर्शन घडवतो. विकास केवळ कागदावर न राहता तो प्रत्यक्ष गावाच्या रस्त्यावर, शाळेत, कार्यालयात आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनात दिसला पाहिजे, या विचारातून काम करणारे मंगेशदादा म्हणूनच ‘विकासपुरुष’ म्हणून जनमानसात ओळखले जातात.
देशाच्या सीमेवर आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानांच्या बलिदानाला अभिवादन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. चाळीसगाव तालुक्यातील सैन्यदलात देशसेवा करताना शहीद झालेल्या जवानांच्या स्मृती जपण्यासाठी शहीद स्मारकांना मंजुरी मिळवून देणे आणि शहीद जवानांना मानवंदना देणे, हे त्यांच्या मनातील राष्ट्रभक्तीचे प्रतीक आहे. शहीदांचे बलिदान पुढील पिढीला प्रेरणा देत राहावे आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती समाजाची कृतज्ञता कायम राहावी, ही भावना त्यांच्या या कार्यामागे आहे. त्यामुळे ते एक संवेदनशील आणि देशभक्त लोकप्रतिनिधी म्हणूनही जनतेच्या मनात स्थान निर्माण करतात.
शेतकरी हा आपल्या समाजव्यवस्थेचा आणि अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी केवळ सभागृहात आवाज न उठवता रस्त्यावर उतरून आंदोलन, मोर्चे आणि संघर्ष करण्याची भूमिका मंगेशदादांनी घेतली आहे. जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करताना प्रसंगी जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवणारे हे नेतृत्व शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेणाऱ्या शेतकरीपुत्राची भूमिका निभावत आले आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी संघर्ष करण्याची ही वृत्ती त्यांच्या राजकीय प्रवासातील महत्त्वाची ओळख आहे.
चाळीसगावकरांशी त्यांचे नाते केवळ राजकीय नाही तर ते भावनिक आणि आध्यात्मिकही आहे. प्रत्येक कार्यकर्ता असो किंवा सामान्य चाळीसगावकर, वाढदिवस अथवा इतर शुभकार्याच्या प्रसंगी श्रीहरी विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती भेट देऊन विठ्ठलभक्तीची परंपरा घराघरात पोहोचविण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. वारकरी संस्कृती, विठ्ठलभक्ती आणि आपल्या मातीशी असलेले नाते जपणारे मंगेशदादा हे खऱ्या अर्थाने विठ्ठलभक्त वारकरीपुत्र म्हणूनही ओळखले जातात.
शिक्षण हा समाजाच्या प्रगतीचा पाया आहे. आर्थिक परिस्थितीमुळे एखाद्या गरीब आणि होतकरू विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये, या भावनेतून तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून मदत करण्याचे कार्य त्यांनी केले आहे. राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाचा जो विचार मांडला, तो पुढे नेण्याच्या भावनेतून गरजू विद्यार्थ्यांना आधार देण्याची ही भूमिका निश्चितच कौतुकास्पद आहे. शिक्षणासाठी मदतीचा हात पुढे करणारे हे दानशूर व्यक्तिमत्त्व अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणेचे स्रोत आहे.
ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी दररोज पायी प्रवास करावा लागतो. विद्यार्थ्यांचा हा त्रास कमी व्हावा, त्यांना वेळेत शाळेत पोहोचता यावे आणि त्यांच्या शिक्षणाचा प्रवास अधिक सुलभ व्हावा, या उद्देशाने १२०० विद्यार्थ्यांना मोफत सायकली देण्याची संकल्पना मांडण्यात आली. ही सायकल केवळ प्रवासाचे साधन नसून त्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यातील प्रवासाची सुरुवात आहे. म्हणूनच हजारो विद्यार्थ्यांसाठी मंगेशदादा हे बाल विद्यार्थी मित्र ठरतात.
आरोग्याच्या बाबतीतही गरीब आणि गरजू नागरिकांना आधार मिळावा, एखाद्या रुग्णाला केवळ आर्थिक अडचणीमुळे उपचारांपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी विविध माध्यमातून रुग्णांना मदत मिळवून देण्याचे कार्य सातत्याने केले जाते. संकटात सापडलेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहून त्यांना उपचारासाठी आवश्यक मदत मिळवून देणारे दादा म्हणजेच तालुक्यातील अनेक गरीब कुटुंबांसाठी आरोग्यदूत आहेत.
अशा असंख्य भूमिका निभावताना मात्र एक गोष्ट कायम राहते आणि ती म्हणजे जनसेवेचा ध्यास. आधुनिक श्रावणबाळ, युवानेतृत्व, भगिनींचे भाऊ, मुलींचे मामा, लोकसेवक, आधुनिक भगीरथ, शेतकरीपुत्र, विठ्ठलभक्त वारकरीपुत्र, विकासपुरुष, आरोग्यदूत, बालमित्र, संवेदनशील देशभक्त आणि लोकनायक ही केवळ विशेषणे नाहीत; तर आपल्या कार्यातून आणि जनतेच्या विश्वासातून निर्माण झालेली त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची विविध रूपे आहेत.
राजकारणात अनेक चेहरे येतात आणि जातात; मात्र काही माणसे आपल्या कामामुळे लोकांच्या मनात कायमची जागा निर्माण करतात. मंगेशदादा चव्हाण हे त्यापैकीच एक नाव आहे. चाळीसगावच्या विकासाचा वेग वाढवताना, सामान्य माणसाच्या अडचणी समजून घेताना, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करताना, तरुणांना सकारात्मक दिशा देताना, ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवताना, विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देताना आणि गरजूंच्या मदतीला धावताना दिसणारे हे नेतृत्व आज चाळीसगावच्या जनतेच्या विश्वासाचे केंद्र बनले आहे.
वाढदिवसाच्या या शुभदिनी श्रीहरी विठ्ठलाच्या चरणी एवढीच प्रार्थना की, मंगेशदादांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, ऊर्जा आणि जनसेवेचे सामर्थ्य लाभो. त्यांच्या नेतृत्वाखाली चाळीसगावच्या विकासाची वाटचाल अधिक वेगाने पुढे जावो, सामान्य माणसाच्या आयुष्यात अधिक सुख-समृद्धी यावी आणि समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाची फळे पोहोचावीत. जनतेच्या सेवेसाठी त्यांचे कार्य असेच अखंड सुरू राहो आणि त्यांच्या कार्याचा हा जनसेवेचा प्रवास दिवसेंदिवस अधिक व्यापक होत जावो, हीच मनःपूर्वक सदिच्छा.
लोकनेते, विकासपुरुष, दमदार, दबंग, धडाकेबाज आणि डॅशिंग नेतृत्व, कार्यसम्राट आमदार मा. श्री. मंगेशदादा चव्हाण यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
आपले कार्य असेच वाढत राहो… आपली जनसेवा अशीच अखंड सुरू राहो… आणि आपल्या नेतृत्वात चाळीसगावच्या विकासाची विजयी वाटचाल अशीच अविरत सुरू राहो!





















